काळभोरनगर येथे आदर्श शिक्षकांचा सत्कार
शबनम न्यूज | प्रतिनिधी
काळभोरनगर येथील जीवन आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित शिक्षिका सुनीता दहिफळे आणि मनिषा कलशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस तथा जीवन आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक विशाल काळभोर यांच्या हस्ते दोन्ही शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगा शिक्षिका जयलक्ष्मी अमीन होत्या.
यावेळी सुनीता दहिफळे म्हणाल्या, “प्रत्येकाने आपल्यातील कला आणि छंद जोपासला पाहिजे. छंदामुळे शारीरिक व्याधी किंवा प्रापंचिक समस्या काही काळ विसरता येतात. त्यामुळे मानसिक समाधान मिळून व्यक्ती निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होते.”
मनिषा कलशेट्टी यांनी ज्येष्ठांच्या अनुभवाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “आम्ही शाळेतून मिळविलेले ज्ञान महत्त्वाचे असले तरी ज्येष्ठांचा जीवनानुभव अधिक प्रगल्भ असतो. समाजाला ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. आम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला असून, त्यामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे.”
विशाल काळभोर म्हणाले, “देशाची भावी उज्ज्वल पिढी आणि राष्ट्र घडविण्याचे महत्त्वाचे काम शिक्षक करतात. शिक्षकांकडे ज्ञानाचे भांडार असते. महापालिकेच्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून सन्मान होणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. त्यामुळे या दोन्ही शिक्षिकांचा सत्कार करताना विशेष आनंद होत आहे.”
दरम्यान, लोकमान्य होमिओपॅथी हॉस्पिटलच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची मोफत रक्तगट तपासणी करण्यात आली. या तपासणीच्या प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयलक्ष्मी अमीन यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष खंडेराव काळे यांनी केले. विजय निकम यांनी आभार मानले, तर प्रकाश परदेशी यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी एकनाथ कालेकर, रवींद्र मांजरेकर, विजय सुर्वे, गोविंद देशमुख, इब्राहिम शेख, सचिन मोकाशी आणि दीपक गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.




Total Users : 225775