spot_img
spot_img
spot_img

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) तर्फे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर; नव्या पदाधिकाऱ्यांची निवड

पुणे करार दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन; ‘युथ बोले तो’ कार्यक्रमाला जाहीर पाठिंबा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) शहराध्यक्ष आयु. सुंदर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात पक्ष संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे तसेच पक्षाच्या आगामी उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमाला लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉ. प्रा. अशोक गायकवाड प्रमुख उपस्थित होते. पुणे जिल्हाध्यक्ष प्रसाद शेलार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी २४ सप्टेंबर १९३२ च्या पुणे करार दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक लढ्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.

‘युथ बोले तो’ कार्यक्रमाला पक्षाचा जाहीर पाठिंबा

यावेळी लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) तर्फे २४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता वेटरनरी ग्राउंड, पटनात आयोजित ‘युथ बोले तो’ या कार्यक्रमाला प्रथमच जाहीर पाठिंबा देण्यात आला. युवकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पक्षाने या कार्यक्रमाला पाठिंबा जाहीर केला.

शिबिरादरम्यान पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महिला अध्यक्षपदी आदिती क्षेत्री, तर युवक अध्यक्षपदी नितीन पटेकर यांची निवड करण्यात आली. याशिवाय अनेक नवीन कार्यकर्त्यांनी लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) मध्ये प्रवेश केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी-चिंचवड आघाडीच्या उपाध्यक्ष वृषालीताई कदम यांनी केले, तर शहर उपाध्यक्ष अमित कुमार आर्य यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहर उपाध्यक्ष हमीद भाई सय्यद, भोसरी विधानसभा अध्यक्ष सायरा बानू शेख, शहर संघटक आनंद भाकरे, प्रभाग क्रमांक १९ चे अध्यक्ष आयु. प्रकाश दाभाडे आणि शहर संघटक नसीम भाई शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष राजाभाऊ धिमधिमे, प्रभाग क्रमांक २१ च्या महिला अध्यक्ष ममता पवार, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष समीना शेख आणि बालाजीनगरचे प्रभाग अध्यक्ष मारुती काळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून पक्ष संघटन विस्तार, नवीन पदाधिकाऱ्यांची निवड आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!