शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १६ मधील विविध रस्त्यांच्या विकासकामांना गती देण्यासाठी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस आणि युवा नेते राजेंद्र तरस यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत विविध रस्त्यांची पाहणी केली. नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि सुकर वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या पाहणीदरम्यान रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
या पाहणीवेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक खोब्रागडे, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे तसेच स्थापत्य व नगररचना विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कृष्ण हॉटेल ते लोढा बेलमांडो सर्व्हिस रोड, मुकाई चौक ते शिंदे पेट्रोल पंप रोड, रुणाल गेटवे–रुणाल स्पेशिओ परिसर, विकासनगर मुख्य रस्ता तसेच लोटस लक्ष्मी ते नाल्यालगत बापदेवनगरकडे जाणाऱ्या डी.पी. रोडची पाहणी करण्यात आली. या रस्त्यांच्या कामांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना आणि पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
प्रभागातील रस्त्यांच्या कामांमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामे लवकरात लवकर सुरू करण्यावर यावेळी भर देण्यात आला. तसेच रस्त्यांच्या विकासकामांचा दर्जा, सुरक्षितता आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
प्रभागातील पायाभूत सुविधांचा विकास आणि नागरिकांना दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिकता आहे. यासाठी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी स्पष्ट केले.




Total Users : 225516