शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालयाच्या अगदी शेजारी सुरू असलेल्या एका खाजगी बांधकाम प्रकल्पासाठी तब्बल ५२ जुन्या आणि मोठ्या झाडांची बेकायदेशीरपणे व अत्यंत निर्घृण कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी वृक्षसंवर्धन विभागातील अधिकारी महेश गारगोटे व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून झाडांचे वय आणि संख्या कागदपत्रांवर कमी दाखवल्याचा आरोप करत आज आम आदमी पार्टी (आप) युवा आघाडीच्या वतीने रविराज काळे यांच्या नेतृत्वात मनपा उद्यान विभागातील अधिकाऱी महेश गारगोटे यांना’पैशांचे झाड’ भेट देऊन अभिनव आणि तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
या प्रकरणी आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर करून दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
1) खाजगी बिल्डरच्या बांधकामात अडथळा ठरणाऱ्या ५२ जुन्या वृक्षांची कत्तल करण्यासाठी उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी झाडांचे वय आणि संख्या यामध्ये फेरफार करून वृक्ष प्राधिकरणाची दिशाभूल केली आहे.
2) या वृक्षतोडीसंदर्भातील अधिकृत माहिती व कागदपत्रे देण्यास अधिकारी टाळाटाळ करत असून, महापालिकेचा कारभार बिल्डरच्या कार्यालयातून चालतोय की काय, असा संताप व्यक्त केला जात आहे.
3) ज्या ना-हरकत दाखल्याच्या (NOC) आधारे सदर प्रकल्पाला बांधकाम परवानगी दिली आहे, ती तातडीने रद्द करण्यात यावी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा.
4) मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व महाराष्ट्र वृक्षतोड कायद्यानुसार, कर्तव्यात कसूर करणाऱ्या व बेकायदेशीर वृक्षतोडीला खतपाणी घालणाऱ्या उद्यान मुख्य अधिक्षक महेश गारगोटे आणि इतर कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत फौजदारी खटला दाखल करावा.
उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग हा पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नसून केवळ बिल्डर धार्जिणी भूमिका घेऊन स्वतःचे उदरभरण करण्यासाठीच कार्यरत आहे का, असा सवाल करत रविराज काळे व ‘आप’ युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उद्यान विभागातील अधिकाऱ्यांना ‘पैशांचे झाड’ भेट देऊन प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला.
“झाडांचे रक्षण करायचे सोडून मनपाचे अधिकारी बिल्डरांच्या फायद्यासाठी जुन्या वृक्षांचा बळी देत आहेत. ५२ झाडांची कत्तल हा थेट पर्यावरणावर झालेला दरोडा आहे. जर मनपा आयुक्तांनी या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने निलंबनाची व चौकशीची कारवाई केली नाही, तर आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण शहरात महापालिकेविरोधात व्यापक आणि तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.”
— रविराज काळे ( प्रदेशाध्यक्ष आप युवा आघाडी)
यावेळी आम आदमी पार्टी व युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ऋषिकेश कानवटे,युवक शहराध्यक्ष विकी पासोटे , योगेश गायकवाड आणि पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Total Users : 225444