सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; आमदार शंकर जगताप यांचा मंडळाच्या वतीने सन्मान
शबनम न्यूज | प्रतिनिधी
सर्वधर्म समभाव, सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेश देणारा श्रीकृष्ण कॉलनीतील गणेशोत्सव गेल्या २० वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्व धर्मांतील नागरिक एकत्र येऊन आनंदाने गणेशोत्सवात सहभागी होतात. परस्परांना मान-सन्मान देत सामाजिक एकतेची जोपासना करणारा श्रीकृष्ण मित्र मंडळाचा हा गणेशोत्सव परिसरात एक आदर्श ठरत आहे.
यंदाही मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर भाऊ जगताप यांचा नबी खान यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वधर्मीय ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले.

या प्रसंगी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक तथा कला-क्रीडा सदस्य तानाजी बारणे, नगरसेविका व प्रभाग अध्यक्ष मनीषा पवार, चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, संदीप गाडे, सनी बारणे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीकृष्ण मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहन तुपे यांच्यासह मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्तांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब गणपत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या उपक्रमातून सामाजिक एकात्मतेची परंपरा जपली जात आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता, विविध धर्मांतील नागरिकांना एकत्र आणणारा आणि परस्परांतील विश्वास अधिक दृढ करणारा उत्सव ठरावा, हा श्रीकृष्ण कॉलनीतील गणेशोत्सवाचा संदेश आहे. गेल्या दोन दशकांपासून ही परंपरा जपत मंडळाने सर्वधर्मीय ऐक्याचा आदर्श निर्माण केला आहे.




Total Users : 225400