spot_img
spot_img
spot_img

भीमशक्तीनगर SRA प्रकल्पाचे पुनर्सर्वेक्षण करा – मारुती जाधव

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मोरेवस्ती, चिखली येथील भीमशक्तीनगर झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पाबाबत नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या विविध तक्रारींची सखोल चौकशी करून प्रकल्पाचे फेरसर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मारुती गणपत जाधव यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
जाधव यांनी २१ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून भीमशक्तीनगर SRA प्रकल्पातील प्राथमिक पात्रता-अपात्रता यादी, संमतीपत्रे आणि सर्वेक्षण प्रक्रियेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. SRAच्या अधिकृत नोंदीमध्ये ‘मोरेवस्ती भीमशक्ती नगर, चिखली’ या वस्तीची नोंद असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
प्राथमिक सर्वेक्षणानंतर प्रसिद्ध झालेल्या पात्रता-अपात्रता यादीमध्ये भीमशक्तीनगर परिसरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या काही झोपडीधारकांना अपात्र ठरविल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष स्थानिक रहिवासी नसलेल्या व्यक्तींची किंवा संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांची नावे यादीमध्ये समाविष्ट झाल्याचे आरोपही नागरिकांकडून होत असल्याने, संपूर्ण यादीची प्रत्यक्ष पडताळणी आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
SRA प्रकल्पासाठी झोपडीधारकांकडून घेण्यात आलेल्या संमतीपत्रांच्या प्रक्रियेबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे जाधव यांनी सांगितले. काही नागरिकांवर दबाव आणून अथवा आर्थिक आमिष दाखवून संमतीपत्रे घेण्यात आल्याचे आरोप होत असल्याने, संबंधित संमतीपत्रांची सत्यता आणि त्यामागील प्रक्रिया तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक संमतीपत्रासोबत संबंधित झोपडीधारकाची ओळख, प्रत्यक्ष ताबा, वास्तव्य आणि स्वाक्षरी अथवा अंगठ्याची स्वतंत्र पडताळणी करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
भीमशक्तीनगर SRA प्रकल्पाचे पुन्हा बायोमॅट्रिक फेरसर्वेक्षण करून हे सर्वेक्षण SRA प्राधिकरण आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. विशेषतः यावेळी बायोमेट्रिक पद्धतीने झोपडीधारकांची पुन्हा नोंदणी व पडताळणी करण्यात यावी, जेणेकरून प्रत्यक्ष लाभार्थी, त्यांचे वास्तव्य आणि पात्रता याबाबत अधिक पारदर्शकता राहील, असे जाधव यांनी नमूद केले आहे.
बायोमॅट्रिक फेरसर्वेक्षणाच्या वेळी प्रत्येक झोपडीधारकाची प्रत्यक्ष उपस्थिती, झोपडीचे अचूक ठिकाण, उपलब्ध कागदपत्रे, वास्तव्याचा पुरावा तसेच SRA प्रकल्पाला दिलेली संमती किंवा विरोध यांची नोंद करण्यात यावी. संपूर्ण सर्वेक्षण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आल्यास भविष्यातील वाद आणि गैरसमज टाळण्यास मदत होईल, असेही जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे.
तसेच प्रकल्पाचा अंतिम आराखडा मंजूर करण्यापूर्वी स्थानिक झोपडीधारकांना पुनर्वसनाचा आराखडा, घरांचे क्षेत्रफळ, इमारतींची संख्या, पुनर्वसनाची जागा आणि उपलब्ध सोयी-सुविधांची स्पष्ट माहिती देण्यात यावी. स्थानिक पात्र झोपडीधारकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या सहभागातूनच पुढील प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी भूमिका जाधव यांनी मांडली आहे.
“भीमशक्तीनगर SRA प्रकल्प हा स्थानिक नागरिकांच्या भवितव्याशी संबंधित विषय आहे. त्यामुळे पात्र-अपात्र यादीपासून संमतीपत्रांपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शकपणे पडताळणी होणे आवश्यक आहे. कोणताही पात्र झोपडीधारक अन्यायाने वंचित राहू नये आणि अपात्र व्यक्तीला लाभ मिळू नये, यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने फेरसर्वेक्षण करून वस्तुस्थिती समोर आणावी,” अशी भूमिका मारुती गणपत जाधव यांनी व्यक्त केली आहे.
“नागरिकांच्या तक्रारींची योग्य पद्धतीने दखल घेऊन चौकशी व बायोमॅट्रिक फेरसर्वेक्षण झाले नाही, तर नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळ पडल्यास न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून न्यायालयात दाद मागणार आहे. नागरिकांच्या हक्कांसाठी कायदेशीर पातळीवरही हा लढा पुढे नेऊ,” असे मारुती जाधव यांनी स्पष्ट केले.
भीमशक्तीनगर SRA प्रकल्पासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन शासन व संबंधित प्राधिकरणांकडून या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी आणि फेरपडताळणी केली जाते का, याकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!