नगरसेविका ऐश्वर्या तरस यांची आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे मागणी; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत परवाना रद्द झालेली अथवा वैध परवान्याशिवाय धावणारी कचरा वाहतूक करणारी वाहने तात्काळ जप्त करून त्यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निगडी परिसरात नुकत्याच घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून, बेकायदेशीर वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरात अनेक कचरा वाहतूक करणारी वाहने संबंधित परवाने रद्द झालेले असतानाही किंवा आवश्यक वैध परवान्यांशिवाय रस्त्यांवर धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, अशा वाहनांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असे ऐश्वर्या तरस यांनी निवेदनात नमूद केले आहे.
निगडी परिसरातील भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना वाहनांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे गंभीर प्रशासकीय निष्काळजीपणा ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. परवाना रद्द झालेली वाहने रस्त्यावर धावत असतील, तर त्यांना परवानगी कशी मिळते, त्यांच्यावर कारवाई का होत नाही आणि यामागे कोण जबाबदार आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व कचरा वाहतूक वाहनांची परवाना पडताळणी करावी. परवाना रद्द झालेली किंवा वैध परवान्याशिवाय धावणारी वाहने तात्काळ जप्त करावीत. संबंधित वाहनमालक, कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनासह दंडात्मक कारवाई करावी. तसेच, बेकायदेशीर वाहनांची यादी सार्वजनिक करून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशा विविध मागण्या तरस यांनी केल्या आहेत.
नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही ऐश्वर्या तरस यांनी दिला आहे. महापालिका प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करावी. अन्यथा, भविष्यात अशा वाहनांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.




Total Users : 225231