पुणे – हास्याचे फवारे उडविणाऱ्या , हलकेच टोपी उडविणाऱ्या, निखळ मनोरंजन करणाऱ्या, भाषेच्या गमती दर्शवणाऱ्या पण अंतरंगी मानवी संवेदनांना साद घालणाऱ्या कवितांनी शनिवारी रात्री रसिकांची दाद मिळवली. अहिराणी, वर्हाडी, मराठवाडी बोलीच्या कवितांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.
पुणे फेस्टिव्हल अंतर्गत शनिवारी रात्री बालगंधर्व रंगमंदिरात मराठी कवी संमेलन रंगले. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, जनरल सेक्रेटरी आणि सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, नगरसेवक सुनील शिंदे, मोहन टिल्लू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कविता सादर करणाऱ्या सर्व कवींचा सन्मान या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ३२ वर्षे सातत्याने या मराठी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन सांभाळणार्या वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचे पुत्र गौरव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नितीन देशमुख (अमरावती), इंद्रजीत घुले (मंगळवेढा), नारायण पुरी (नांदेड), गोपाल मापारी (बुलढाणा), प्रशांत मोरे (ठाणे), शशिकांत तिरोडकर(फोंडा), अनिल दीक्षित (पुणे), तालिब सोलापुरी (सोलापूर) अशा राज्यांच्या विविध भागांचे प्रतिनिधित्व करणारे कवी संमेलनात सहभागी झाले होते. शिरूर येथील कवी भरत दौंडकर यांनी सूत्रसंचालन केले.
कवी नितीन देशमुख यांच्या पावसा छेडू नको…या कवितेतील
वेगळा काढेन मी विस्तवातून गारवा
उघडले हदयातले श्रावणाचे दार मी, या ओळींनी ठाव घेतला.
गोपाल मापारी यांनी सादर केलेल्या कवितेतील
कदाचित नाव गांधींचे दिले असणार मार्गाला
म्हणूनच चालणार्यांची इथे गर्दी कमी आहे, हा आशय दाद मिळवणारा ठरला.
शशिकांत तिरोडकर यांच्या भेट नावाच्या कवितेतील – असा चिकटला पारा, की काच आरसा झाली, चौकट सावरताना प्रतिमाच निखळली होती, या ओळींनी रसिकांना अंतर्मुख केले.
आला नवा परिवारवाद, मतदाता बाद
दिमागी नक्सल हा झाला
आंदोलकजीवी बोला त्याला
वर्षावर चारा बहरलेला, बांधलेली ढोरं दावणीला, असे वास्तवाचे एक चित्र नारायण पुरी यांच्या कवितेने मांडले.
अनिल दीक्षित यांनी लोकशाहीला उद्देशून म्हटलेल्या, माझी कुणा म्हणू मी, ही कविता सर्वसामान्यांच्या मनातल्या प्रश्नांना वाचा फोडणारी होती. तिला वन्समोअर मिळाला.
इंद्रजीत घुले यांनी लग्नातलं जेवण या कवितेतून हास्याची कारंजी उडविली. प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं…या ओळींनी टाळ्या मिळवल्या.
बुवाबाबांना चढलेली अध्यात्माची नशा आता उतरणार आहे
तुटणार आहे तंद्री, समाधी भंग पावणार आहे…या कवितेने सद्यस्थितीचे चित्र उभे केले.
प्रशांत मोरे यांनी मैना या कवितेतून एक वेगळीच व्यथा व्यक्त केली. एका कुंकवापायी दूर मैना उडून जाईल, राघू एकला राहील याद मैनेची येईल…अशा शब्दांत कवीने वेदना मांडली होती.
कवी सोलापुरी यांच्या उर्दू – हिंदी – मराठी भाषांतील मिश्र कवितेने वेगळीच रंगत निर्माण केली. रचनादृष्ट्याही त्यांच्या कविता वेगळ्या ठरल्या. सूत्रसंचालक भरत दौंडकर यांचेही सादरीकरण दाद घेऊन गेले.
समाजातील जातीव्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या, जेन झी ची मानसिकता सांगणार्या, झुरळ पार्टीच्या, ईव्हीएमच्या, दानपेटीच्या, नीट संदर्भांच्या, स्पर्धा परीक्षांच्या, लाडक्या बहिणींच्या, रस्त्यांवरच्या खड्ड्यांच्या, बेरोजगारीच्या, सुक्या-ओल्या दुष्काळांच्या, आत्महत्यांच्या…कितीतरी आशयवैविध्य मांडणाऱ्या या कवितांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाची दाद दिली.




Total Users : 224138