spot_img
spot_img
spot_img

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार
औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वांगीण योगदानाची दखल; मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान

पुणे : शैक्षणिक, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, संस्थानिर्मिती, कौशल्य विकास, उद्योजकीय दृष्टिकोन आणि सामाजिक उपक्रमांमधील भरीव योगदानाची दखल घेत, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना प्रतिष्ठेच्या ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील ताज विवांता येथे न्यूज १८ लोकमत आयोजित विशेष सोहळ्यात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रा. डॉ. चोरडिया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया उपस्थित होत्या. हा गौरव त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, शिक्षण क्षेत्रातील समर्पित कार्याचा आणि समाज व राष्ट्रनिर्मितीप्रती असलेल्या अखंड बांधिलकीचा सन्मान आहे.

‘महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील दिग्गज एकाच व्यासपीठावर’ या संकल्पनेअंतर्गत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आठ मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये शिक्षण क्षेत्रातून महाराष्ट्रातील एकमेव पुरस्कारार्थी म्हणून प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची निवड करण्यात आली. ‘उद्योगरत्न’ उपक्रमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेण्यात आली. तसेच महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासमोरील संधी, आव्हाने आणि भविष्यातील शक्यता यावरही या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला.

प्रा. डॉ. चोरडिया यांनी १९९९ मध्ये शिक्षण क्षेत्रातील कार्याला सुरुवात केली. पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन आत्मविश्वासू, कुशल, जबाबदार आणि सामाजिक भान असलेले नागरिक घडविण्याच्या उद्देशाने त्यांनी कार्य सुरू केले. गेल्या २७ वर्षांत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या विस्ताराचे नेतृत्व करताना विविध शैक्षणिक संस्था आणि उपक्रमांच्या विकासात त्यांनी योगदान दिले आहे. दोन दशकांहून अधिक काळाचा औद्योगिक अनुभव आणि शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ वाटचाल यामुळे त्यांची उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्य विकास, मूल्याधिष्ठित शिक्षण, नवकल्पना आणि सामाजिक बांधिलकी याविषयीची भूमिका अधिक व्यापक झाली आहे. शिक्षण आणि उद्योग यांनी एकत्रितपणे काम केल्यास कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन देशाच्या विकासाला चालना मिळू शकते, असा त्यांचा विश्वास आहे. याच दृष्टिकोनातून ‘सूर्यभारत’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची संकल्पना पुढे नेण्यात येत आहे.

‘सूर्यभारत’ हा शिक्षण, कौशल्य, तंत्रज्ञान, नवकल्पना आणि उद्योजकता यांचा समन्वय साधणारा भविष्याभिमुख उपक्रम म्हणून विकसित करण्याची संकल्पना आहे. भारताच्या आर्थिक विकासाला चालना देतानाच नव्या संधी निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. विविध क्षेत्रांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ‘सूर्यभारत’च्या माध्यमातून केला जाणार आहे. या एकात्मिक दृष्टिकोनातून उद्योजकतेला प्रोत्साहन, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत विकासाच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. गुणवत्ता, नैतिक प्रशासन, नियमांचे पालन, नवकल्पना आणि शाश्वत विकास या तत्त्वांवर आधारित ‘सूर्यभारत’च्या माध्यमातून भारतीय उद्योजकतेला बळकटी देत विकसित भारताच्या वाटचालीत योगदान देण्याचे उद्दिष्ट आहे.

स्वामी विवेकानंद, जेआरडी टाटा, आदित्य विक्रम बिर्ला, अझीम प्रेमजी, नारायण मूर्ती आणि सद्गुरू यांच्या विचारधारा व कार्यातून प्रेरणा घेत ‘सूर्यदत्त’मध्ये दूरदृष्टी, उत्कृष्टतेचा ध्यास, नवोन्मेष, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना सातत्याने प्राधान्य दिले जाते. याच मूल्याधिष्ठित विचारांना केंद्रस्थानी ठेवून सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्यविकास, उद्योजकता, नवोन्मेष आणि उद्योगनिर्मितीला चालना देत समाज आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थपूर्ण व परिवर्तनशील संधी निर्माण करण्याचे कार्य पुढे नेले जात आहे.
 
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “उद्योग रोजगार आणि संधी निर्माण करतो, तर त्या संधींना गती देण्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ शिक्षणातून तयार होते. शिक्षणातून कौशल्य, कौशल्यातून संधी आणि संधींतून विकास, या विश्वासातून ‘सूर्यभारत’ची वाटचाल सुरू झाली आहे.” शिक्षण, उद्योग आणि सामाजिक विकास यांच्यातील दुवा अधिक मजबूत करून कुशल मनुष्यबळ घडविणे, नव्या संधी निर्माण करणे आणि भविष्यकालीन समाजाची उभारणी करणे, हा या संकल्पनेचा केंद्रबिंदू आहे.”

या प्रतिष्ठित सन्मानाबद्दल सूर्यदत्त परिवार आणि संपूर्ण सूर्यदत्त परिवारातील सदस्यांच्या वतीने प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. ज्ञान, मूल्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व यांची सांगड घालत परिवर्तनाची वाटचाल घडविणाऱ्या त्यांच्या कार्याला मिळालेली ही पावती प्रत्येक सूर्यदत्त परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वातून आणि कार्यातून भविष्यातही असंख्य विद्यार्थी, युवा, उद्योजक आणि समाजघटकांना प्रेरणा मिळत राहो आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला यशाची नवी शिखरे लाभोत, अशी भावना सूर्यदत्त परिवारातील सर्वांनीच व्यक्त केली आहे. 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!