spot_img
spot_img
spot_img

‘घन ओथंबून येती’ काव्यमैफलीत रंगले शब्दसूर ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात काव्य सादरीकरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 शब्दांचे सौंदर्य, भावनांची अभिव्यक्ती आणि काव्याचा मनमोहक आविष्कार अशा वातावरणात रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘घन ओथंबून येती’ या संकल्पनेवर आधारित काव्य सादरीकरण स्पर्धा आणि काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी वाङ्मय मंडळ तसेच मराठी, हिंदी आणि इंग्लिश विभागांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून स्नेहवर्धन प्रकाशनाच्या प्रकाशिका डॉ. स्नेहल तावरे उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. काव्य सादरीकरण स्पर्धेचे परीक्षण काव्यरसिक मंजिरी एंडाईत आणि डॉ. सचिन चव्हाण यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. स्नेहल तावरे यांनी काव्य सादरीकरणातील विविध सौंदर्यपैलू उलगडून सांगितले. आचार्य मम्मट यांच्या काव्यशास्त्राचा संदर्भ देत त्यांनी काव्यातील ‘कांतासंमित उपदेश’ ही संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या आणि रसाळ पद्धतीने समजावून सांगितली. कविता ही प्रियतमेच्या मृदू आणि प्रभावी उपदेशाप्रमाणे मनाचा ठाव घेणारी असते, असे सांगत त्यांनी कवितेच्या भावविश्वाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.

या काव्य सादरीकरण स्पर्धेत एकूण १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या काव्यप्रतिभेचे दर्शन घडविले. स्पर्धेतील विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक प्रतिक भांगरे, द्वितीय क्रमांक मानसी बनसोडे आणि तृतीय क्रमांक तृप्ती शिगवणकर यांनी मिळविला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक भारती धानवे, तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक अजय थेरवडकर यांनी पटकावला.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे आणि त्यांच्या काव्यगुणांचे कौतुक केले. साहित्य आणि कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत इंग्लिश विभागप्रमुख डॉ. सविता पाटील यांनी केले. प्रा. कृष्णा घोलप यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. ऐश्वर्या कुंभार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या काव्यमैफलीला महाविद्यालयातील ५९ विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला साहित्यिक आणि काव्यमय वातावरण लाभले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!