शबनम न्यूज | प्रतिनिधी
“स्वातंत्र्याच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ९ ऑगस्ट १९४२ रोजी आयोजिलेल्या अधिवेशनात ‘भारत छोडो’चा नारा दिला होता. त्यानंतर पाच वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतर मात्र आपल्याला ‘भारत जोडो’ म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘भारत जोडो’चा हा उद्देश साकारण्यासाठी बंधुतेची आणि मानवतेची भावना समाजात रुजवण्याची गरज आहे,” असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत अॅड. प्रार्थना सदावर्ते यांनी व्यक्त केले.
विश्वबंधुता साहित्य परिषद, विश्वबंधुता काव्यमंच आणि काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्वबंधुतेचा ‘तिरंगा महोत्सव’ कार्यक्रमातअॅड. सदावर्ते बोलत होत्या. नवी पेठेतील पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, साहित्यिक प्रा. शंकर आथरे, कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, स्वागताध्यक्ष डॉ. बंडोपंत कांबळे, बंधुता प्रकाशनच्या संचालक मंदाकिनी रोकडे व आशा शिंदे-गायकवाड उपस्थित होत्या. यावेळी आशा शिंदे-गायकवाड यांना ‘संविधान सन्मान साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच प्रा. शंकर आथरे यांच्या ‘वाणी विश्वबंधुतेची’ या भाषणसंग्रहाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
अॅड. प्रार्थना सदावर्ते म्हणाल्या, “सध्या आपल्या आजुबाजूला अतिशय वाईट परिस्थिती आहे. शेतकरी आत्महत्या, आंदोलने, खून, हिंसाचार, पेपरफुटी, मंदिरांमधील चोरी, कोलमडलेली कुटुंबव्यवस्था अशा गोष्टी सातत्याने घडत आहेत. यामध्ये सामान्य नागरिक भरडला जात असून, त्याचे प्रश्न कायम आहेत. सामान्यांना सरकारचा आधार वाटेनासा झाला आहे. मात्र मतदारांचा पुढाऱ्यांवर वचक असायला हवा. यासाठी संविधानाला राष्ट्रग्रंथ मानून राष्ट्रबंधुता आणि माणूसकी जपायला हवी.”
प्रकाश रोकडे म्हणाले, “तिरंगा आणि अशोकचक्र हे आपल्या प्रजासत्ताक भारताच्या एकतेचे, अखंडतेचे आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक आहे. प्रजापिता सम्राट अशोकाने बनवलेले हे चक्र आपल्याला राष्ट्रीय अस्मितेचा, गतिमानतेचा, नितीमानतेचा, परिवर्तनाचा आणि पुरोगामीत्त्वाचा संदेश देते. तेव्हा तिरंग्याचा आपण आदर आणि अभिमान बाळगायला हवा. प्रत्येकाच्या घरामध्ये संविधान आणि तिरंगा असायलाच हवा.”
डॉ. बंडोपंत कांबळे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. आशा शिंदे-गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. शंकर आथरे यांनी आभार मानले.
यावेळी झालेल्या ‘विश्वबंधुतेची पहाट’ काव्यसंमेलनात सीमा गांधी, डॉ. वैशाली मोहिते, जयश्री श्रोत्रिय, वर्षा मोरे, निशा खापरे, बबन धुमाळ, पौर्णिमा कुंभारकर, अमित घुले, अश्विनी वाघमारे, नानासाहेब कांबळे, जितेन सोनावणे, विजय रायकर, अजय रायकर, अलका जोशी, पुष्पांजली मराठे, अरुण वाळूंज यांनी कवितांचे सादरीकरण केले. तसेच रविंद्र राव, विद्या आटक, तुकाराम कांबळे, अविनाश पवार, प्रकाश परडे, कल्पना म्हापूसकर, पुष्पांजली मराठे, सुनील बोरसे, वीणा होरा, किशोरी पाटील, दिनेश चव्हाण यांना यावेळी ‘विश्वबंधुता प्रकाशदूत’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला.



