शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये अभ्यागतांकडून प्राप्त झालेल्या विविध निवेदने व तक्रारींची प्रत्यक्ष दखल घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून त्यांचा तातडीने निपटारा करण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, कार्यकारी अभियंता संतोष दुर्गे तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान अभ्यागतांनी अनधिकृत बांधकामे, रस्त्यांची दुरुस्ती, अतिक्रमण, स्मशानभूमी, क्रीडा सुविधा, शिक्षण, स्थापत्य विषयक कामे, आरोग्य सेवा, वैद्यकीय सुविधा, मालमत्ता कर, विविध विकासकामे, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच नागरिकाभिमुख योजनांशी संबंधित तक्रारी आणि निवेदने आयुक्तांसमोर मांडली.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्येक निवेदन व तक्रार बारकाईने ऐकून घेत संबंधित विभागप्रमुखांकडून वस्तुस्थितीची माहिती जाणून घेतली. तक्रारींचे स्वरूप, त्यातील अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ज्या प्रकरणांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे, त्या प्रकरणांमध्ये संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधण्याचे निर्देश देखील दिले.
महापालिकेच्या प्रशासनाचा केंद्रबिंदू नागरिक आहे. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक तक्रारीकडे संवेदनशीलतेने पाहून तिचा कालबद्ध आणि प्रभावी निपटारा करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रत्येक विभागाने उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून नागरिकांना दर्जेदार, पारदर्शक आणि तत्पर सेवा उपलब्ध करून द्यावी, असेही ते यावेळी म्हणाले.
नागरिकांच्या समस्यांच्या तातडीच्या निवारणासाठी प्रत्यक्ष निवेदने स्वीकारून अधिकाऱ्यांना दिल्या कार्यवाहीच्या सूचना
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरिकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासनाच्या दृष्टीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर गुरुवारी सायंकाळी ४ ते ६ ही वेळ अभ्यागतांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी निश्चित वेळ राखून ठेवली आहे. या वेळेत नागरिक त्यांच्या तक्रारी, सूचना, अडचणी तसेच विविध विषयांवरील निवेदने थेट आयुक्तांकडे सादर करू शकतात. याअंतर्गत आज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागप्रमुख, अधिकारी यांच्यासमवेत अभ्यागतांकडून प्राप्त झालेली निवेदने स्वीकारून त्यांच्या तक्रारी आणि समस्या ऐकून घेतल्या. यानंतर प्रत्येक प्रकरणाची माहिती संबंधित विभागप्रमुखांकडून जाणून घेत त्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर तात्काळ संबंधित अधिकारी आणि विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.



