spot_img
spot_img
spot_img
spot_img

कुदळवाडीतील विष्णु ग्रीन्स परिसरातील कचरा समस्येवर १५ दिवसांत कायमस्वरूपी उपाययोजना; महापौर रवि लांडगे यांचे निर्देश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कुदळवाडी परिसरातील विष्णु ग्रीन्स सोसायटीसमोरील कचरा साचण्याची समस्या तसेच स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांची महापौर रवि लांडगे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि तक्रारी जाणून घेतल्या.

पाहणीदरम्यान नागरिकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने निर्माण होणारी अस्वच्छता, वारंवार प्लास्टिक, टायर व इतर भंगाराला आग लावून होणारे वायू प्रदूषण तसेच परिसराच्या स्वच्छतेसंदर्भातील विविध प्रश्न मांडले. या सर्व बाबींची महापौर रवि लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर माहिती घेतली.

त्यानंतर महापौर रवि लांडगे यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्यासमवेत सविस्तर चर्चा केली. यावेळी कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, नियमित स्वच्छता, बेकायदेशीर कचरा टाकण्यावर नियंत्रण, प्रदूषण रोखण्यासाठी समन्वित कार्यवाही तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देण्याबाबत निर्देश देण्यात आले.

यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील १५ दिवसांच्या आत विष्णु ग्रीन्स परिसरातील कचरा समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आदेश महापौर रवि लांडगे यांनी दिले. तसेच कचरा साचणार नाही, परिसर कायमस्वरूपी स्वच्छ राहील आणि प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रकारांवर कठोर कारवाई होईल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांनाही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. परिसरात बेकायदेशीरपणे कचरा टाकणे किंवा जाळण्याच्या घटना आढळल्यास त्याची माहिती तातडीने महापालिकेला देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

“कुदळवाडी परिसरातील विष्णु ग्रीन्स सोसायटीसमोरील कचरा समस्या ही केवळ स्वच्छतेचा विषय नसून नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित अत्यंत गंभीर बाब आहे. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील १५ दिवसांत प्रभावी उपाययोजना पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करून प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या हिताशी संबंधित कोणत्याही प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.

  • महापौर रवि लांडगे

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!