सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास तानाजी बिरादार यांचे आयुक्तांना निवेदन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरलेले असतानाही शहरात लागू असलेली १५ टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करून नागरिकांना नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास तानाजी बिरादार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. तसेच रावेत बंधाऱ्यातूनही पूर्ण क्षमतेने पाणी उचलले जात असताना शहरात अद्याप १५ टक्के पाणी कपात कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक भागांत कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असून नागरिकांना टँकरद्वारे पाणी खरेदी करावे लागत आहे. यामुळे गृहनिर्माण संस्थांवर लाखो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेने स्मार्ट मीटर, स्काडा प्रणाली, अमृत योजनेअंतर्गत जलवाहिन्या बदलणे आणि नवीन पाइपलाइन टाकणे अशी विविध कामे केली असली, तरी शहरातील पाणी गळती आणि टँकरवरील अवलंबित्व अद्यापही कमी झालेले नाही. धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना पाणी कपात कायम ठेवण्याचे कोणतेही औचित्य नसल्याचा मुद्दा बिरादार यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे १५ टक्के पाणी कपात तात्काळ रद्द करून शहरातील नागरिकांना नियमित, पुरेशा दाबाने आणि मुबलक पाणीपुरवठा करावा. तसेच पाणी गळती रोखण्यासाठी आणि टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.



