spot_img
spot_img
spot_img

डॉ. कुमार सप्तर्षींनी गांधी विचार नव्या पिढीत नेण्याचे काम केले – शरद पवार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ ची जबाबदारी कुमारने आपल्या खांद्यावर घेतली आणि गांधी विचार नव्या पिढीत प्रसृत कसा होईल ह्याची खबरदारी त्यांनी घेतली. आज त्या संस्था जपल्या पाहिजेत. कारण त्या संस्था नाहीत, विचारधारा आहेत. महात्मा गांधीजींचा विचार जतन करणं, तो वाढेल ह्याची काळजी घेणं हे व्रत म्हणून कुमारने स्वीकारलं होतं. तुमची-माझी जबाबदारी आहे. विचाराने प्रामाणिकपणाने काम करणारे संस्थेचे जे घटक आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, युवक क्रांती दलाचे संस्थापक, माजी आमदार आणि सत्याग्रही मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बालगंधर्व येथे रविवारी सकाळी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. कबीर उमा कुमार, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त शिवाजीराव कदम, सचिव अन्वर राजन व्यासपीठावर उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अॅड. अंकुश काकडे यांनी सुत्रसंचलन केले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अलीकडे एक चित्र पुण्यामध्ये बघायला मिळतं की, ज्या अनेक संस्था अनेक मान्यवरांनी पुण्यात उभ्या केल्या त्या संस्थेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणारा एक वर्ग आहे त्या वर्गापासून कमीतकमी गांधींचा विचार हा वाचवला पाहिजे. ही जी भूमिका कुमारची होती, त्या भूमिकेला आपण सर्वांनी जे कुणी काम करत असतील त्यांना साथ देणं हीच कुमारसाठी श्रद्धांजली आहे.

पवार पुढे म्हणाले की, कुमारचा आग्रह असायचा की, दुष्काळी भागातील शेतकरी, तरुण-तरुणी पिढीला मदत करता येईल असं धोरण सरकारने आखावं. तसा आग्रहच कुमारने विधिमंडळात आणि सत्ताधारी पक्षाकडे सातत्याने मांडला. एक काम करणारा, नव्या पिढीचा आत्मविश्वास वाढवणारा, महात्मा गांधींचा विचार जतन केला पाहिजे हे सूत्र घेऊन कष्ट करणारा एक मोठा नेता म्हणून आपण कुमारला पाहतो. आज ते आपल्यात नाहीत. पण तो विचार आहे, त्यांनी केलेलं काम आहे ते आपण अखंडपणे जपूया.

लोकमतचे संपादक संजय आवटे म्हणाले की, विचार करणारे नेतृत्व करत नाहीत आणि नेतृत्व करणारे विचार करत नाहीत. विचार न करणे हीच आता नेतृत्वाची पूर्व अट झाली आहे. अशा वेळी हे दोन्ही एकत्र असणारे असे डॉ. सप्तर्षी होते. माझ्या विचारांची जडण घडण डॉ. कुमार सप्तर्षी आणि कुमार केतकर यांच्यामुळे घडली. एखाद्या विषयाकडे माणूस किती अंगाने पाहू शकतो हे त्यांच्या सहवासातून समजले. शेती, माती कळते त्यांना महानगरी कळत नाही. पण सप्तर्षी यांना शेती, महानगरी आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याची चांगली समज होती. त्यांनी गांधी आणि आंबेडकर एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला. तो सगळ्यात महत्वाचा आहे. आंबेडकरवाद्यांना गांधी समजत नाही. आणि गांधी वाद्यांना आंबेडकर कळत नाही. अशावेळी गांधी अधिक आंबेडकर अधिक नेहरु असे सुत्र सप्तर्षींनी मांडले. काही लोकांचे महत्व प्रभावातून, काहींचे दबावातून कळते तर सप्तर्षींसारख्यांचे महत्व काहींचे अभावातून कळते.

अशोक वानखेडे म्हणाले की, गांधीला पुजताना लोक पाहिले पण गांधींचे विचार आत्मसात करणारे लोक कमी होत चालले आहेत. पुणे हे बिल्डरांचे शहर मानले जाते. आणि जेथे जमिन तेथे बिल्डरांचा डोळा असतो. अशावेळी आमची जबाबदारी आहे की, गांधी भवन ची गरीमा आहे ती राखली जावी. सप्तर्षी यांची आजच्या काळात जास्त गरज होती.

युवकांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा संदर्भ देत वानखेडे म्हणाले की, युवकांनी चिर युवा असलेल्या सप्तर्षींना वाहिलेली ही श्रद्धांजली आहे. या क्षणिक विजयाने जास्त उत्साहीत होण्याची गरज मला वाटत नाही. मी हा विजय मानत नाही. हे आंदोलन विषय आधारित होते. अण्णा आंदोलन सारखे या आंदोलनाचे होणार नाही ना याची भिती वाटते. युवांची उर्जा हवी आहे. पण त्याबरोबर विचार हवा. युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक चिर युवा पाहिजे. जो सप्तर्षी यांच्या रुपात दिसत होता. ते आमच्यात नाही. ही मोठी कमी मला जाणवते. श्रध्दांजलीच्या रुपातून हा विचार पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वांनी जर प्रयत्न केले तर ती खरी श्रध्दांजली होईल.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!