spot_img
spot_img
spot_img

आपत्ती व्यवस्थापनात समन्वय, तत्परता आणि पूर्वतयारीला प्राधान्य द्या – अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सर्व विभागांनी समन्वयाने व तत्परतेने कार्य करावे, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनात पूर्वतयारी, प्रभावी समन्वय आणि तातडीचा प्रतिसाद ही यशस्वी व्यवस्थापनाची प्रमुख सूत्रे आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सज्ज राहावे. क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंते यांनी सातत्याने समन्वय ठेवून क्षेत्रातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे. क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) कार्यरत ठेवणे ही प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाची प्राथमिक जबाबदारी असून, कोणतीही आपत्कालीन माहिती प्राप्त होताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.

संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन शहरातील सखल भागांची नियमित पाहणी करून तेथील नागरिकांना वेळोवेळी सतर्क करावे. सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्रांची निवड करून ती शाळा किंवा अन्य सार्वजनिक इमारतींमध्ये उभारावीत. निवारा केंद्रांमध्ये स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृहे तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

आरोग्य व वैद्यकीय विभागाने क्षेत्रनिहाय स्वतंत्र वैद्यकीय पथके स्थापन करून आवश्यक औषधसाठा, वैद्यकीय साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे. पुनर्वसनासाठी आवश्यक वाहने कायम सज्ज ठेवावीत. पाणी साचणाऱ्या भागांमध्ये तात्काळ पाण्याचा उपसा करण्यासाठी आवश्यक क्षमतेचे पंप कार्यरत स्थितीत ठेवण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागांना दिले.

धोकादायक ठिकाणी तातडीने कारवाई करता यावी यासाठी स्थापत्य विभागाने आवश्यक त्या ठिकाणी जेसीबी यंत्रसामग्री उपलब्ध ठेवावी. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात ‘आपदा मित्र’ स्वयंसेवक पथकाशी सातत्याने समन्वय ठेवून त्यांचा प्रभावी सहभाग सुनिश्चित करावा. सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्यांनुसार पूर्वतयारी पूर्ण करून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा चोवीस तास सज्ज ठेवाव्यात, असेही अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले.

बैठकीस मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंते अजय सूर्यवंशी व अनिल भालसाखळे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, सीताराम बहुरे, राजेश आंगळे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, निवेदिता घार्गे, परशुराम वाघमोडे, अजिंक्य येळे, पूजा दुधनाळे, गोरख लिमन, मुकेश कोळप, सहाय्यक आयुक्त उमा दर्वेश, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, अमित पंडित, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरुण दगडे, डॉ. अंजली नलावडे यांच्यासह कार्यकारी अभियंते तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!