spot_img
spot_img
spot_img
spot_img

स्मार्ट सिटी’च्या दाव्याला कचऱ्याचा डाग! विशाल नगर ते बाणेर जोडणाऱ्या नवीन पुलावर कचऱ्याचे साम्राज्य

आम आदमी पार्टीचे रविराज बबन काळे यांचा प्रशासनाला संतप्त सवाल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

  विशाल नगरकडून बाणेरकडे जाणाऱ्या नवनिर्मित पुलावर सध्या मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. एका बाजूला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहर ‘स्मार्ट सिटी’ असल्याचा छातीठोक दावा करत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र नवीन पुलावरच कचऱ्याचे ढीग साचल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, “येथील स्थानिक नगरसेवक आणि प्रशासन नेमकं करतंय काय?” असा संतप्त सवाल आम आदमी पार्टीचे नेते रविराज बबन काळे यांनी उपस्थित केला आहे.
 पुलावर कचरा टाकून तो तसाच पडून राहिल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून,’स्मार्ट सिटी’च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना, मुख्य रस्त्यांवरील आणि पुलांवरील साध्या कचऱ्याचे व्यवस्थापनही प्रशासनाला करता येत नाही, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
             या समस्येवर केवळ कोरडे आंदोलन किंवा निवेदने देण्यापेक्षा आम आदमी पार्टीने आता थेट आणि आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविराज बबन काळे यांनी पालिका प्रशासनाला कडक शब्दांत चेतावणी दिली आहे की, “स्थानिक नागरिकांना दररोज ज्या नरकयातना आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे, त्याची खरी तीव्रता एसी केबिनमध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना कळाली पाहिजे. जर प्रशासनाने तातडीने हा कचरा उचलला नाही, तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते हा सर्व कचरा स्वतः उचलतील आणि थेट महानगरपालिकेच्या आवारात आणून टाकतील. जो त्रास जनतेला होतोय, तोच त्रास प्रशासनालाही अनुभवायला लावला जाईल.”
​नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ पालिकेने त्वरित थांबवावा आणि या पुलाची स्वच्छता करून भविष्यात येथे कचरा पडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी ‘आप’चे रविराज बबन काळे यांनी केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!