माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्या पुढाकारातून २० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजारांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘यशस्वी भव!’ हा भव्य गुणगौरव सोहळा शनिवार, ४ जुलै रोजी प्रा . रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर व नगरसेवक श्री. तुषारभाऊ हिंगे आणि ‘आरंभ सोशल फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर तुषारभाऊ हिंगे आणि आरंभ फाउंडेशनच्या संचालिका सोनाली हिंगे यांच्या हस्ते उपस्थित सर्व पाहुण्यांचा सन्मानचिन्ह, पुस्तक आणि कमलपुष्प देऊन सस्नेह सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे उत्तम निवेदन अक्षय मोरे यांनी केले.
या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गरिबातील गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने आरंभ सोशल फाउंडेशनच्या वतीने २० गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती’चे प्रत्येकी १०,००० रुपयांचे धनादेश (Cheques) आणि प्रशस्तीपत्रक वितरित करण्यात आले.

या अभिनव उपक्रमाची पार्श्वभूमी सांगताना माजी उपमहापौर तुषारभाऊ हिंगे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साऊंड सिस्टीम व अवाजवी गोष्टींवर खर्च करण्याऐवजी, आम्ही समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे ठरवले. सणांसाठी वर्गणी गोळा न करता, वस्तीतील ज्या मुलांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, त्यांना थेट उच्च शिक्षणासाठी आम्ही ही १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली. विद्यार्थ्यांचे कौतुक करताना तुषार हिंगे म्हणाले, खचून न जाता कायम प्रगती करा, तुमच्यामधूनच देशाचा एक उत्तम नागरिक घडावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या सोहळ्यात पिंपरी-चिंचवड मनपाच्या रुग्णालयात ‘वॉर्ड आया’ म्हणून काम करणाऱ्या सेवा वस्ती मधील महिलांचा साडी देऊन करण्यात आलेला सन्मान सर्वांचे डोळे ओलावणारा ठरला. १० वी पास नसल्याने मागील ऑगस्ट महिन्यात या महिलांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले होते. उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्याने या महिलांनी तुषारभाऊ हिंगे यांची भेट घेतली. तुषारभाऊंनी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय स्तरावर पत्रव्यवहार करून, मुंबईतील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन या महिलांसाठी शिक्षणाचा व कामाचा १ वर्षाचा अवधी मागून घेतला. सरकारच्या मंजुरीनंतर या महिला केवळ दोन महिन्यांत पुन्हा कामावर रुजू झाल्या. विशेष म्हणजे, ज्या रुग्णालयात या माता काम करतात, त्याच रुग्णालयात काम करत त्यांनी व त्यांच्या मुलींनी एकत्र अभ्यास केला आणि १० वी च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. या वॉर्ड मावशींनी परीक्षेत तब्बल ८० टक्क्यांपर्यंत गुण मिळवले आहेत. “शिक्षणाला वयाची मर्यादा नसते हे आम्हाला तुषारभाऊंनी शिकवले,” अशी भावनिक प्रतिक्रिया या महिलांनी दिली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी या महिलांची सेवा खंडित न करता १ वर्ष मुदतवाढ दिल्याचे आवर्जून जाहीर केले.
प्रसिद्ध करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी बदलत्या शिक्षण पद्धतीवर भाष्य करत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आजच्या आधुनिक काळातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ (Artificial Intelligence) बद्दल माहिती देताना ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी एआय (AI) पासून लांब न पळता, त्याच्याशी जुळवून घेऊन पुढे जायला हवे. तंत्रज्ञानाचा आपल्या प्रगतीसाठी आणि अभ्यासासाठी कसा सकारात्मक उपयोग करून घेता येईल, यावर विचार करणे ही आजच्या काळाची गरज आहे.”
विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी तुषार हिंगे यांच्या संघर्षाचे कौतुक केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी नेहमी आई-वडिलांविषयी आदर ठेवला पाहिजे, तरच ते एका विशिष्ट उंचीवर पोहोचू शकतात. एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा तुषार हिंगे आज उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या बळावर प्रभावीपणे राजकारणात आला, शहराचा उपमहापौर झाला आणि आज बिझनेसमध्येही तेवढाच मोठा झाला आहे.”
यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प केला.
या सोहळ्याला आमदार उमा खापरे, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे, भाजप नेते सदाशिव खाडे, मारुती भापकर, मानव कांबळे, नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, सौ.सुप्रिया चांदगुडे, महिला आघाडी शहराध्यक्ष सौ.सुजाता पालांडे, स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, मंडल अध्यक्ष सनी बारणे, तसेच आरंभ फाउंडेशनच्या सौ.प्रगती हिंगे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



