spot_img
spot_img
spot_img

मोबाईल चोरीच्या संशयातून मित्राचा खून; दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांत आरोपीला जेरबंद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोबाईल चोरी केल्याच्या संशयातून एका व्यक्तीचा निर्घृण खून करून फरार झालेल्या आरोपीला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोई गावाजवळील गुरुकृपा हौसिंग सोसायटीमध्ये २ जुलै रोजी रात्री एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. डायल ११२ वर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

मृत व्यक्तीची ओळख चाँद याकुब शेख (वय ४२, रा. केशवनगर, चिखली) अशी पटली. याप्रकरणी मृताची पत्नी शहनाज चाँद शेख यांच्या फिर्यादीवरून दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान मृतकासोबत राहणारा हिरालाल सुभाषचंद्र गौतम (वय २८) हा दोन दिवसांपासून फरार असल्याचे निष्पन्न झाले. साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी वाघोली-केसनंद परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

सखोल चौकशीत आरोपीने २९ जून रोजी रात्री मोबाईल घेतल्याच्या संशयावरून चाँद शेख याला गंभीर मारहाण करून त्याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

अटक आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील नागला खादर गावचा रहिवासी असून सध्या मोई गाव परिसरात मजुरीचे काम करत होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये आणि त्यांच्या पथकाने आरोपीला अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल देवडे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!