शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईत आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे कार्यरत असलेल्या मोठ्या आंतरजिल्हा दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली असून अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली ही गुप्त मोहीम राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे ३० पोलीस कर्मचारी आणि FDA चे २० हून अधिक अधिकारी अशा सुमारे ५० जणांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
तपासादरम्यान मंचरमधून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीतून या भेसळ रॅकेटची व्याप्ती समोर आली. त्यानंतर पुणे, सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, अहिल्यानगर, सांगली तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.
प्राथमिक तपासात मंचर हे या संपूर्ण रॅकेटचे मुख्य केंद्र असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईमुळे दूध भेसळीच्या मोठ्या साखळीचा भंडाफोड झाला असून, जप्त केलेल्या साहित्याची आणि नमुन्यांची तपासणी सुरू आहे. संबंधित आरोपींविरोधात अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.


