शबनम न्यूज | प्रतिनिधी
आषाढी वारीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना आळंदी येथे इंद्रायणी नदीने धोकादायक पातळी गाठली असून शहराला जोडणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. खंडाळा व लोणावळा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून प्रशासनाने सर्व पुलांवरील वाहतूक तातडीने बंद केली आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो वारकरी आळंदीकडे रवाना होण्याच्या तयारीत असताना प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वारकरी व भाविकांना आळंदीत येऊ नये, जिथे आहेत तिथेच सुरक्षित थांबावे, असे आवाहन केले आहे.
इंद्रायणी नदीकाठावरील आश्रम शाळांमध्येही पाणी शिरले असून नदीलगतच्या घाट परिसरासह सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आळंदी नगर परिषद, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, पुणे–नाशिक महामार्गावरील सूर्य इलेक्ट्रॉनिक्स परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने चाकणकडे जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहनचालकांनी आळंदी फाटा मार्गे पुण्याकडे जाणारा पर्यायी मार्ग वापरावा, असे प्रशासनाने सांगितले आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुढील काही तासांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इंद्रायणी नदी पुढे भीमा नदीला मिळत असल्याने नदीकाठच्या भागातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, नदीपात्र, घाट परिसर तसेच बंद करण्यात आलेल्या पुलांजवळ जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणा हायअलर्टवर असून इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीवर आणि वारीच्या नियोजनावर सर्वांचे लक्ष लागून आहे.


