पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या १९५ व्या आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात उच्चस्तरीय आढावा बैठका पार पडल्या. पालखी मार्ग, मंदिर परिसर, वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत सखोल चर्चा करून पोलिसांनी व्यापक नियोजन आखले आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देहू आणि आळंदी येथील मंदिर संस्थानांचे विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, दिंडी मालक आणि पदाधिकारी उपस्थित होते. पालखी मार्गावरील संभाव्य अडचणी, पर्यायी मार्ग, वारकऱ्यांची सुरक्षितता तसेच वाहतूक व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
यावेळी पोलीस आयुक्त चौबे यांनी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा पालखी सोहळा शांततामय, सुरक्षित आणि भक्तीमय वातावरणात पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. विश्वस्तांनी मांडलेल्या सूचनांची नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना पूर्वतयारीचे आदेश देण्यात आले.
बैठकीस पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली तसेच विविध विभागांचे पोलीस उपायुक्त उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी विश्वस्तांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


