spot_img
spot_img
spot_img

लक्ष्मण शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ जाहीर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ यंदा किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड, खडकी (पुणे) येथे कार्यरत असलेल्या लक्ष्मण सर्जेराव शिंदे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारामध्ये २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

मूळचे सातारा जिल्ह्यातील खोजेवाडी येथील रहिवासी असलेले लक्ष्मण शिंदे हे सध्या पुण्यातील नवी सांगवी येथे वास्तव्यास आहेत. गेल्या तब्बल ३० वर्षांपासून ते किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेडच्या खडकी प्लांटमध्ये सीआरई प्रोटो असेंब्ली विभागात असेंब्ली टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत.

शिंदे यांनी उत्पादनक्षमता, गुणवत्ता, सुरक्षितता, प्रथमोपचार, सजेशन, कायझेन, ऊर्जा बचत, पाणी संवर्धन आदी विविध उपक्रमांमधून कंपनीच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. आपल्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि संघभावनेच्या बळावर त्यांनी कामगार वर्गात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कंपनीतील जबाबदाऱ्यांसोबतच शिंदे यांनी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. राम नदी स्वच्छता अभियान आणि राम नदी प्रकल्पात त्यांनी सक्रिय सहभाग घेत पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

किर्लोस्कर कंपनीतील विविध समित्यांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून ते कला-क्रीडा समिती सदस्य, किर्लोस्कर भजनी मंडळ सदस्य, वारकरी सांप्रदाय पालखी सोहळ्याचे उपाध्यक्ष, फर्स्ट एड समिती सदस्य, सेफ्टी समिती सदस्य तसेच वॉश उपक्रमाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

शिंदे यांना यापूर्वीही विविध संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये सामाजिक कार्य गौरव पुरस्कार (२०२२-२३), राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार (२०२४) आणि मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार (२०२५) यांचा समावेश आहे. तसेच किर्लोस्कर कंपनीत ३० वर्षांची यशस्वी सेवा पूर्ण केल्याबद्दल कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर यांच्या हस्ते त्यांना एमडी अवॉर्ड प्रदान करण्यात आला होता.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना लक्ष्मण शिंदे म्हणाले, “हा सन्मान माझा एकट्याचा नसून किर्लोस्कर कंपनीतील सर्व कामगार, अधिकारी, व्यवस्थापन आणि सहकाऱ्यांचा आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच मला हे यश मिळाले. या पुरस्कारामुळे भविष्यातही अधिक जोमाने समाज आणि कामगारांसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

पिंपरी चिंचवड मधून शिंदे यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली याचा संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरवासीयांना अभिमान वाटावा अशी हि निवड असून सर्वस्तरातून शिंदे यांचे अभिनंदन होत आहे.

कामगार क्षेत्रातील निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्य कामगारांना आधार देणारे शांत, संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मण शिंदे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!