spot_img
spot_img
spot_img

अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकांवर कारवाई करा : खासदार श्रीरंग बारणे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात टँकरने मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. टँकर चालक हे पाणी कोठून घेतात, ते पिण्यायोग्य आहे का याची चौकशी करावी. पैसे जास्त घेऊन सोसायटीधारकांना आर्थिक बुर्दंड टाकला जातो. सोसायटीधारकांची लूट थांबवावी. त्यासाठी टँकर चालकांवर निर्बंध आणावेत. त्यांची नोंद ठेवावी. स्वच्छ पाणी न दिल्यास टँकर चालकांवर कारवाई करण्याची सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. तसेच इतर विकास कामांबाबत काटकसर करावी. पाणीपुरवठ्याच्या कामांवर भर देऊन ही कामे तत्काळ पूर्ण करावीत. याबाबत आयुक्त आणि महापौरांशीही चर्चा करणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

शहरात चार दिवसांपासून पाणी कपात करण्यात आली. विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने खासदार बारणे यांनी सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नागसेविक सुलभा उबाळे, ऐश्वर्या तरस, नगरसेवक निलेश तरस, राजेंद्र तरस, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता महेश बरिदे, विजयसिंह भोसले, सुनिल अहिरे, कनिष्ठ अभियंता अनिश ओक उपस्थित होते. दरम्यान, खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या आठ वर्षात पवना धरणातील एक लाख क्युबिक मीटर गाळ काढल्याने दीड महिना पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला. एक टीएसी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवली नाही. शासनाची कोणतीही मदत न घेता खासदार बारणे यांनी लोकसहभागातून हा गाळ काढला. अन्यथा गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागले असते.

खासदार बारणे म्हणाले, कमी दाबाने, अस्वच्छ पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. समान पाणीपुरवठा होत नाही. काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी पाणी येतच नाही. पाणी समान वाटपासाठी स्काडा प्रणाली बसविली. मीटर बदलले. जलवाहिनी बदललली. पाण्याच्या टाक्या सर्वाधिक उभारल्या. ३० टक्के पाणी गळती होत आहे. अनधिकृतपणे नळजोड घेतले जातात. ते रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. नियोजनशून्य कारभारामुळे पाणी समस्या कायम आहे. प्रशासन उशिरा जागे झाले आहे. पाणी काटकसरीचे नियोजन अगोदरच करणे अपेक्षित होते. पाणी बचतीचे वर्षभर नियोजन करावे. स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी आत्तापासूनच तयारी करावी. महापालिका अशुद्ध पाणी उपसा करित असलेला नदी पात्राचा परिसर अतिशय अस्वच्छ आहे. तेथील नदीपात्र स्वचछ करावे. मुळशी धरणातून अतिरिक्त सात टीएमसी पाणी आणण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा.

एसटीपी चालू की बंद यावर देखरेख ठेवावी

शहरातील ४९४ सोसायट्यांपैकी ३६९ सोसायट्यांमधील एसटीपी चालू आहेत. १२५ सोसायट्यांमधील एसटीपी बंद आहेत. सोसायट्यांमधील एसटीपी चालू आहेत की नाही यावर निगराणी ठेवावी. एसटीपीतील पाणी वाहने धुने, उद्यानासाठी वापरण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करावे. जुन्या सोसायट्यांना एसटीपी उभारणे शक्य नाही. तिथे महापालिकेने लहान एसीटीपी उभारण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली.

गृहप्रकल्पासाठी बंद जलवाहिनीचे पाईप काढले

पवना बंदिस्त जलवाहिनीची कोट्यवधी रुपये खर्च करुन टाकलेली पाईपलाईन किवळेतील कैवल्य सोसायटी आणि सेंटीयोगा या दोन सोसायट्यांनी बांधकाम परवानगी विभागाच्या संगनमतानी काढली आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधीचे रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोण आहे, त्याचा शोध घ्यावा आणि कठोर कारवाई करावी अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!