प्रभाग २३ मधील पाणीपुरवठा, सुशोभीकरण, भटके कुत्रे आणि स्वागत कमानीसह विविध विकासकामांसाठी निवेदन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
थेरगाव परिसरातील नागरिकांच्या विविध मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधत प्रभाग क्रमांक २३ च्या भाजप नगरसेविका मनिषा प्रमोद पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यापासून ते पाणीपुरवठा, सुशोभीकरण आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येपर्यंत अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
नगरसेविका पवार यांनी बापूजी बुवा मंदिरालगतच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि उंच अश्वारूढ पुतळा उभारावा, तसेच त्या ठिकाणी ‘शिवसृष्टी’ साकारावी, अशी प्रमुख मागणी केली आहे. यामुळे शिवरायांच्या विचारांचा प्रचार-प्रसार होऊन तरुण पिढीला प्रेरणा मिळेल, असे त्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय, प्रभाग क्रमांक २३ मध्ये अनेक दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणी येणे तसेच दूषित आणि गढूळ पाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून स्वच्छ, शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करावा, पाणीपुरवठ्याची वेळ बदलावी तसेच परिसरात मोठी पाण्याची टाकी उभारावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बापूजी बुवा मंदिर परिसर आणि लगतच्या उद्यानाचे आधुनिकीकरण करण्याची मागणी करताना पवार यांनी या बागेचे डिजिटल पद्धतीने सुशोभीकरण करण्यावर भर दिला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देत हे उद्यान आकर्षक आणि आधुनिक स्वरूपात विकसित करावे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, परिसरातील भटक्या आणि बेवारस कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तसेच थेरगावातील जगतापनगर परिसरात नागपूरच्या दीक्षाभूमीप्रमाणे भव्य स्वागत कमान उभारण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत असल्याचे नमूद करत, या मागणीचा सकारात्मक विचार करून परिसराच्या वैभवात भर घालणारी आकर्षक कमान उभारावी, असेही पवार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रभाग क्रमांक २३ मधील विविध नागरी सुविधा, विकासकामे आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर तातडीने कार्यवाही करून विकासाला गती द्यावी, अशी अपेक्षा नगरसेविका मनिषा पवार यांनी व्यक्त केली आहे. यावेळी युवा नेते प्रमोद पवार, प्रेम पवार उपस्थित होते.


