आता दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत नागरिकांना भेटणार पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे
प्रतिनिधी युनूस खतीब पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नागरिकांच्या तक्रारी, समस्या व सूचना थेट जाणून घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पोलीस आयुक्तांची भेट’ या उपक्रमाच्या दिवस व वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे हे नागरिक व तक्रारदारांना समक्ष भेटून त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी दर सोमवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत हा उपक्रम राबवत होते. मात्र, प्रशासकीय कारणास्तव या उपक्रमाचा दिवस व वेळ बदलण्यात आला आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, पुढील आठवड्यापासून ‘पोलीस आयुक्तांची भेट’ हा उपक्रम दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
त्यामुळे सोमवार, 22 जून 2026 रोजी हा उपक्रम होणार नसून, त्याऐवजी शुक्रवार, 26 जून 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत नागरिकांना पोलीस आयुक्तांची भेट घेता येणार आहे. त्यानंतर हा उपक्रम नियमितपणे प्रत्येक शुक्रवारी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाने दिली आहे.
या बदलाची नोंद घेऊन नागरिकांनी नव्या वेळेनुसार आपल्या तक्रारी, समस्या व सूचना मांडाव्यात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.


