spot_img
spot_img
spot_img

महापालिकेच्या सर्व विभागांची अद्ययावत माहिती असलेली अधिकृत डायरी प्रकाशित करा – भाऊसाहेब भोईर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व विभागांची अद्ययावत माहिती समाविष्ट असलेली अधिकृत डायरी तयार करून ती नगर सदस्य, पत्रकार तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

महानगरपालिकेच्या विविध विभागांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी, सूचना आणि समस्यांचे निराकरण करताना नगर सदस्य, पत्रकार व अधिकारी यांना सातत्याने परस्पर संपर्क साधावा लागतो. मात्र, सन २०१७ पर्यंत नियमितपणे उपलब्ध करून दिली जाणारी अधिकृत डायरी त्यानंतर बंद झाल्याने कामकाजात अडचणी निर्माण होत असल्याचे भोईर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सध्या विविध विभागांचे कार्यालयीन पत्ते, अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, ई-मेल पत्ते आणि इतर महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व विभागांची माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रस्तावित डायरीमध्ये महापालिकेच्या सर्व विभागांचे कार्यालयीन पत्ते, विभागप्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांची नावे, दूरध्वनी व मोबाईल क्रमांक, अधिकृत ई-मेल पत्ते, विभागनिहाय कार्यक्षेत्र व जबाबदाऱ्या, आपत्कालीन संपर्क क्रमांक तसेच प्रमुख समित्या आणि विभागांची संक्षिप्त माहिती समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अशी डायरी उपलब्ध झाल्यास नगर सदस्यांना नागरिकांच्या समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधणे सोपे होईल. तसेच पत्रकारांना अचूक माहिती मिळविणे सुलभ होऊन प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांमधील समन्वय अधिक प्रभावी होईल. परिणामी प्रशासनाची कार्यक्षमता वाढून नागरिकांना अधिक चांगल्या व वेळेवर सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला आहे.

महापालिका प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर अधिकृत डायरी प्रकाशित करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!