spot_img
spot_img
spot_img

महापालिकेत चुकीचे पायंडे पाडू नका; भाऊसाहेब भोईरांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा विषय पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका करत, “महापालिकेत तुमची सत्ता आहे म्हणून चुकीचे पायंडे पाडू नका,” असा इशारा दिला.

महापालिकेच्या जून महिन्यातील महासभेतही स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा विषय मंजुरीसाठी आला नाही. निवडणुकीनंतर पाच महिने उलटूनही भाजपच्या सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर न झाल्याने विरोधकांनी प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सभागृहात बोलताना भोईर म्हणाले की, प्रशासनाने आयुक्तांच्या माध्यमातून कार्यादेश काढून स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा विषय सभागृहात आणला असताना तो वारंवार का टाळला जात आहे, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे. “तुमची महायुती असल्याचे सांगता, मग नावे जाहीर करण्यास विलंब का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याच्या तीन सदस्यांची नावे आयुक्तांकडे पूर्वीच सादर करण्यात आल्याचा दावा करत, केवळ अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून मात्र सात नावांवर एकमत होत नसल्याने हा विषय रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या मुद्द्यावरून महासभेत वातावरण काही काळ तापले होते. विरोधकांनी स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा निर्णय तातडीने जाहीर करण्याची मागणी केली असून, अन्यथा हा प्रश्न अधिक तीव्रतेने उपस्थित करण्याचा इशाराही दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!