“महापालिकेनेच उभारावी अत्याधुनिक शाळा” – राहुल कलाटे
स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के प्रवेश आरक्षणाची महासभेत जोरदार मागणी
पिंपरी : पुनावळे परिसरातील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली महापालिकेची मौल्यवान जागा खाजगी शिक्षण संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा रंगली. नगरसेवक राहुल कलाटे यांनी या प्रस्तावाला ठाम विरोध दर्शवत महापालिकेनेच या ठिकाणी अत्याधुनिक शाळा विकसित करावी, अशी मागणी करत महासभेत उपसूचना मांडली.
पुनावळे येथील सुमारे ९१ गुंठे जागेवर विकास आराखड्यानुसार माध्यमिक शाळेचे आरक्षण असून, ही जागा खाजगी शिक्षण संस्थेला भाड्याने देण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली आहे. मात्र, एवढ्या महत्त्वाच्या विषयावर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्वासात न घेता निर्णय प्रक्रिया पुढे नेण्यात आल्याचा आरोप करत राहुल कलाटे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“संबंधित आरक्षित जागा एकूण सुमारे १८० गुंठ्यांची आहे. त्यापैकी केवळ ९१ गुंठे जागाच ताब्यात आली असून तीही समप्रमाणात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत प्रशासनाने घाईघाईने निविदा प्रक्रिया का राबविली, याची सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
कलाटे यांनी सांगितले की, वाकडमध्ये महापालिकेने सीबीएसई निकषांनुसार उभारलेली आधुनिक शाळा नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याच धर्तीवर पुनावळे, ताथवडे आणि वाकड परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून महापालिकेने स्वतःची दर्जेदार शैक्षणिक संस्था उभारावी. या ठिकाणी शाळेसोबत क्रीडा संकुल आणि इतर सार्वजनिक सुविधा विकसित करण्याची मोठी संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरात झपाट्याने होत असलेले नागरीकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील गरजांसाठी उपलब्ध आरक्षित जागांचा वापर सार्वजनिक सुविधांसाठीच झाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
याचबरोबर, महापालिका कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मुलांसाठी प्रवेश प्रक्रियेत किमान ४० टक्के जागा आरक्षित ठेवण्याची महत्त्वपूर्ण उपसूचनाही त्यांनी महासभेसमोर मांडली.
“आमच्या वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरात वाढते नागरीकरण पाहता उपलब्ध आरक्षित जागाही भविष्यातील सुविधा विकासासाठी अपुऱ्या पडतील. त्यामुळे शक्य असल्यास महापालिकेनेच येथे शाळा विकसित करावी. तसेच स्थानिक नागरिक आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ४० टक्के प्रवेश आरक्षण असावे,” अशी भूमिका राहुल कलाटे यांनी सभागृहात मांडली.
या उपसूचनेमुळे पुनावळेतील शैक्षणिक आरक्षणाच्या जागेचा वापर, स्थानिक विद्यार्थ्यांचे हक्क आणि महापालिकेच्या शैक्षणिक धोरणाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.




Total Users : 238300