पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप सुधारित विकास योजना (DP) नियोजन समितीवर स्थायी समितीतील तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये स्थायी समितीचे तत्कालीन सभापती अभिषेक बारणे, नगरसेवक संदीप कसपटे आणि नगरसेविका सारिका गायकवाड यांचा समावेश करण्यात आला आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीने यापूर्वीच्या ठरावानुसार नियोजन समितीसाठी चार तज्ज्ञ व्यक्तींची सहसदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये निवृत्त सहसंचालक प्रकाश भुक्ते , निवृत्त उपसंचालक दत्तात्रय निवृत्ती पवार, निवृत्त उपसंचालक उत्तरेश्वर नामदेव लोंढे तसेच पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रातील नरसू श्रीपती शिंदे यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 28(2) नुसार नियोजन प्राधिकरणाच्या स्थायी समितीतील कमाल तीन सदस्य तसेच नगररचना, पर्यावरण किंवा तत्सम क्षेत्रातील विशेष ज्ञान अथवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या कमाल चार तज्ज्ञ सदस्यांचा समावेश नियोजन समितीत करणे आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने स्थायी समितीतील अभिषेक बारणे, संदीप कसपटे आणि सारिका गायकवाड यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, चार तज्ज्ञ सदस्यांसह समितीची रचना पूर्ण करण्यात आली आहे. या समितीमार्फत शहराच्या भविष्यातील विकास आराखड्याशी संबंधित महत्त्वपूर्ण नियोजन प्रक्रियेला दिशा मिळणार आहे.




Total Users : 238300