पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मागील तीन सर्वसाधारण सभांचे थेट ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यामुळे सभागृहातील चर्चा, विकासकामांवरील वादविवाद, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील आरोप-प्रत्यारोप तसेच विविध विषयांवरील भूमिका नागरिकांना प्रत्यक्ष पाहता येत होत्या. मात्र, सोमवार (दि. १५ जून) रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार नसल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण म्हणजे महापालिकेच्या कारभारातील पारदर्शकतेचे प्रतीक मानले जाते. नागरिकांना त्यांच्या प्रतिनिधींचे कामकाज आणि शहराच्या विकासासंदर्भातील निर्णय प्रक्रिया थेट पाहण्याची संधी यामुळे मिळत होती. त्यामुळे अचानकपणे हे प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागरिकांमधून असा सवाल विचारला जात आहे की, “थेट प्रक्षेपणामुळे सभागृहातील वास्तव परिस्थिती आणि विकासकामांवरील चर्चा जनतेसमोर येत असल्याने सत्ताधारी भाजप घाबरला आहे का?” मागील काही सभांमध्ये शहराच्या विकासकामांबाबत विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न, विविध प्रकल्पांतील विलंब तसेच प्रशासनाच्या निर्णयांवर झालेली चर्चा यामुळे सत्ताधारी पक्षाला वारंवार बचावात्मक भूमिका घ्यावी लागल्याचे दिसून आले होते.
याच पार्श्वभूमीवर उद्याची सर्वसाधारण सभा ऑनलाइन प्रसारित न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. विरोधकांकडूनही या निर्णयावर टीका होण्याची शक्यता असून, महापालिकेच्या कामकाजातील पारदर्शकता कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला जाऊ शकतो.
दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून थेट प्रक्षेपण बंद करण्यामागील अधिकृत कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे या निर्णयामागील नेमके कारण काय, याबाबत उत्सुकता कायम आहे.


