शबनम न्यूज | प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत प्रशिक्षण महासंचालनालय (डीजीटी) यांनी देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) श्रेणीकरण (ग्रेडिंग) जाहीर केले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण विभागाने (आयटीआय) उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत देशपातळीवर मानाचे स्थान मिळविले आहे.
प्रशिक्षण महासंचालनालयाने आयटीआयद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची गुणवत्ता, शैक्षणिक कामगिरी, प्रशिक्षण सुविधा, रोजगाराभिमुखता, संस्थात्मक व्यवस्थापन आणि विविध कार्यक्षमतेच्या निकषांच्या आधारे डेटा चलित ग्रेडिंग पद्धती लागू केली आहे. या पद्धतीनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी डीजीटी एमआयएस पोर्टलवरील माहितीच्या आधारे देशातील सर्व आयटीआयचे मूल्यमापन करण्यात आले.
या ग्रेडिंगमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी आयटीआयने १० पैकी ९.२ गुण प्राप्त करून देशात ७ वा क्रमांक, महाराष्ट्र राज्यात ५ वा क्रमांक, पुणे विभागात २ रा क्रमांक तसेच पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान पटकावला आहे.
विशेष म्हणजे, संस्थेने सलग दुसऱ्या वर्षी अशी उल्लेखनीय कामगिरी नोंदवून आपल्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण व्यवस्थेची आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांची प्रभावी छाप उमटविली आहे. संस्थेच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांना आणि कौशल्य विकासासाठी करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या यशामुळे अधिक बळ मिळाले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण विभागासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या नियंत्रणाखाली संस्थेचे कामकाज प्रभावीपणे सुरू आहे. या यशामध्ये संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले असल्याची भावना औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडीचे प्राचार्य तथा विभागप्रमुख शशिकांत पाटील यांनी व्यक्त केली.
मोरवाडी आयटीआयच्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता, प्रशिक्षणाची उत्कृष्टता आणि उद्योगाभिमुख कौशल्य विकास क्षेत्रातील विश्वासार्हता पुन्हा अधोरेखित झाली असून भविष्यातही अधिक उंची गाठण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे प्राचार्य तथा विभागप्रमुख शशिकांत पाटील यांनी सांगितले.





Total Users : 213725