स्पर्धास्थळी वैद्यकीय पथक व रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्याची सूचना
पिंपरी-चिंचवड : महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना दुखापत विमा संरक्षण (Accident Insurance) देण्यात यावे, अशी मागणी भाजपा क्रीडा शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांनी केली आहे. स्पर्धांदरम्यान होणाऱ्या दुखापतींमुळे खेळाडू व त्यांच्या कुटुंबियांवर उपचारांचा आर्थिक भार पडत असल्याने ही योजना राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अरुण पाडुळे यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये हजारो खेळाडू उत्साहाने सहभागी होत असतात. उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या प्रयत्नात अनेकदा खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागतो. अशा वेळी वैद्यकीय उपचारांचा खर्च संबंधित खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांनाच करावा लागतो. त्यामुळे स्पर्धेच्या नोंदणी प्रक्रियेसोबतच सर्व खेळाडूंना विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
यासोबतच स्पर्धा स्थळी प्रशिक्षित वैद्यकीय पथक, प्राथमिक उपचार केंद्र आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली. गंभीर दुखापतीच्या प्रसंगी तातडीने उपचार मिळाल्यास खेळाडूंचे मोठे नुकसान टाळता येईल, असे त्यांनी नमूद केले.
खेळाडूंना सुरक्षिततेची हमी मिळाल्यास अधिकाधिक युवक क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित होतील आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल, असा विश्वासही पाडुळे यांनी व्यक्त केला. आगामी काळात महानगरपालिका प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये दुखापत विमा योजना लागू करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहराचे क्रीडा सभापती कैलास भाऊ कुटे, नगरसेवक निलेशजी नेवाळे, शामजी जगताप, उत्तमजी केंदळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन सानप उपस्थित होते.
क्रीडा सभापती कैलास भाऊ कुटे यांनी या मागणीची दखल घेत सकारात्मक विचार करून प्रशासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


