spot_img
spot_img
spot_img

हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर बुलडोझर!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत सहा अवैध दारू विक्री केंद्रे जेसीबीच्या सहाय्याने कायमची नेस्तनाबूत केली. पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि एमआयडीसी प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी (दि. ११) ही कारवाई केली.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांनी शहरातील अवैध हातभट्टी दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिल्यानंतर ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी या कारवाईचे नेतृत्व केले.

अवैध बांधकामांवरही कारवाई

हातभट्टी दारू विक्रीसाठी उभारण्यात आलेली अनेक ठिकाणे अनधिकृत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी एमआयडीसी प्रशासनाशी पत्रव्यवहार करून ही अवैध बांधकामे हटविण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार गुरुवारी संयुक्त पथकाने जेसीबीच्या सहाय्याने सर्व अवैध अड्डे जमीनदोस्त केले.

या आरोपींच्या अड्ड्यांवर कारवाई

पोलिसांनी खालील आरोपींच्या अवैध हातभट्टी दारू विक्री केंद्रांवर कारवाई केली :

– दुरेश रमेश राठोड – सिग्मा चौक, महाळुंगे
– लखन जडजा शिंदे – सिग्मा चौक, महाळुंगे
– पुष्पादेवी शांतीलाल जाट – हिंदुस्थान पेट्रोल पंप परिसर, निघोजे
– लखन हाजुरीया ठाकूर – डी.के. चौक, कुरुळी
– उदय अशोक कलाल – एच.पी. पेट्रोल पंपाजवळ, तळवडे रोड
– सुश्मिता बंडू हितेज – सुभाषवाडी, निघोजे

अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा इशारा

शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यवसाय, गुन्हेगारी आणि बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या किंवा अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त डॉ. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक दिवसे व त्यांचे पथक तसेच एमआयडीसीचे अधिकारी कर्डिले आणि त्यांच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!