शबनम न्यूज | प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (सीडीओई) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची संधी उपलब्ध होणार असून, नियमित महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण पद्धतीतून अतिरिक्त अभ्यासक्रम पूर्ण करून दुहेरी पदवी मिळविण्याची संधी मिळणार आहे.
औपचारिक शिक्षण पद्धतीतून शिक्षण पूर्ण करणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण हा प्रभावी पर्याय ठरत आहे. शिकण्याची लवचीकता, परवडणारी शुल्क रचना आणि यूजीसीच्या दूरस्थ शिक्षण मंडळाची मान्यता ही या अभ्यासक्रमांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच महिलांसाठी उच्च शिक्षणाची दालने खुली करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील अभ्यास केंद्रांमध्ये प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन तसेच अध्ययन साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. सर्व अभ्यासक्रमांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी पूर्णवेळ प्राध्यापकांचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल, अशी माहिती दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. वैभव जाधव यांनी दिली.
ऑनलाइन शिक्षण पद्धतीत एमबीए, एमसीए, बीबीए आणि बीसीए हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तर दूरस्थ शिक्षण पद्धतीत कला, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखांतील विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना निवडता येणार आहेत. कला शाखेअंतर्गत मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि गणितशास्त्र विषय उपलब्ध आहेत. तसेच पदव्युत्तर स्तरावर मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आणि शिक्षणशास्त्र या विषयांचा समावेश आहे. याशिवाय बी.कॉम., एम.कॉम. आणि एमबीए अभ्यासक्रमही उपलब्ध करण्यात आले आहेत.
उच्च शिक्षणाची संधी अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला चालना देण्यासाठी विद्यापीठाचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.


