शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे-मुंबई महामार्गावर केलेल्या धडक कारवाईत सुमारे १.३६ कोटी रुपयांची संशयित बनावट विदेशी दारू जप्त करत मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कंटेनर चालकाला अटक करण्यात आली असून संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पुणे-मुंबई महामार्गावर संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेली दारू ‘रॉयल सिलेक्ट डिलक्स व्हिस्की’ या ब्रँडची असल्याचे समोर आले.
प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाब उघड झाली असून ही दारू गोव्यात तयार करण्यात आली होती, मात्र तिच्यावर मध्य प्रदेशात उत्पादन व विक्रीसाठी अधिकृत असल्याचे दर्शविणारी बनावट लेबले लावण्यात आली होती. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कागदपत्रेही संशयास्पद आणि बनावट असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.
या कारवाईत दारूसह कंटेनर आणि संबंधित साहित्य असा एकूण १.३६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या चालकाकडून अधिक चौकशी सुरू असून या रॅकेटमागील सूत्रधार, पुरवठादार आणि वितरण साखळीतील इतर संबंधितांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या दारूचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यानंतर दारू बनावट असल्याबाबत अंतिम निष्कर्ष समोर येणार आहे. या कारवाईमुळे राज्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, संबंधित नेटवर्कच्या इतर कड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध राज्यांतील यंत्रणांशी समन्वय साधला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


