spot_img
spot_img
spot_img

ट्राफिक बडीचा प्रभाव! मे महिन्यात १,३६५ वाहतूक तक्रारींचा २४ तासांत निपटारा

प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड : शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने सुरू केलेला ‘ट्राफिक बडी’ हा ऑनलाइन व्हॉट्सअॅप चॅटबॉट नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे. मे २०२६ या एका महिन्यात या माध्यमातून प्राप्त झालेल्या तब्बल १,३६५ तक्रारींचा यशस्वी निपटारा करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात राज्यासह देशभरातून रोजगार, व्यवसाय आणि शिक्षणासाठी नागरिक स्थायिक होत आहेत. शहराच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, वाहतूक कोंडी व विविध वाहतूकविषयक समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, पोलीस सहआयुक्त शशीकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ट्राफिक बडी’ हा व्हॉट्सअॅप चॅटबॉट उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहतूक कोंडी, वाहतूक व्यवस्थेतील अनियमितता, खराब रस्ते, बेकायदेशीर पार्किंग, ट्रॅफिक सिग्नलमधील बिघाड, वाहतूकविषयक सूचना तसेच जड-अवजड वाहनांकडून होणारे नियमभंग अशा विविध विषयांवरील तक्रारी फोटोसह नोंदविता येतात.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागामार्फत तिचे निराकरण २४ तासांच्या आत करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच तक्रारीवर झालेल्या कारवाईची माहिती तक्रारदाराला संदेशाद्वारे तत्काळ कळविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, वाहतूक व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी ‘ट्राफिक बडी’वर स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. यामुळे वाहतूक समस्या ओळखणे आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करणे अधिक सुलभ होत असल्याचे वाहतूक विभागाचे म्हणणे आहे.

मे २०२६ या महिन्यात ट्राफिक बडीवर आलेल्या एकूण १,३६५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

वाहतूक पोलीस विभागाने पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन केले आहे की, वाहतूक कोंडी, वाहतूक नियमन आणि इतर वाहतूकविषयक समस्या सोडविण्यासाठी ‘ट्राफिक बडी’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रमांक ८७८८६४९८८५ चा जास्तीत जास्त वापर करावा.

याबाबतची माहिती पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी प्रसिद्धीस दिली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!