शबनम न्यूज | प्रतिनिधी
सोशल मीडियावर उपरोधिक स्वरूपात सुरू झालेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) ने आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलनाची हाक दिली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका टिप्पणीला गमतीशीर उत्तर देण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा व्हर्च्युअल पक्ष अल्पावधीतच युवकांमध्ये लोकप्रिय ठरला असून सोशल मीडियावर त्याला मोठा पाठिंबा मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षाने दिल्लीतील जंतरमंतर येथे आपल्या पहिल्या आंदोलनाचे आयोजन केले आहे. NEET पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.
आंदोलनापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके शनिवारी सकाळी अमेरिकेहून दिल्लीत दाखल झाले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर साध्या वेशातील काही पोलिसांनी त्यांना अज्ञातस्थळी नेल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, त्यानंतर आंदोलनासाठी जंतरमंतर येथे परवानगी मिळाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी प्रशासनाला इशारा दिला. अभिजीत दिपके किंवा पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला अटक करण्यात आल्यास आपण ४२ दिवसांचे उपोषण सुरू करू, असे त्यांनी म्हटले आहे.
जंतरमंतर येथे आंदोलनाला सुरुवात झाली असून मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले आहेत. घोषणाबाजी, फलक आणि विविध मागण्यांद्वारे आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर सुरू झालेली चळवळ आता प्रत्यक्ष आंदोलनाच्या स्वरूपात समोर आल्याने या घडामोडीकडे देशभराचे लक्ष लागले आहे.




Total Users : 225961