शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवड येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सप्तगढ हाऊसिंग सोसायटीमधील विविध मूलभूत समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी तथागत वेलफेअर फाउंडेशनने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांनी २०२३ मध्ये सदनिका ताब्यात घेतल्या असल्या तरी अद्याप अनेक समस्या कायम आहेत. या समस्या त्वरित सोडवून रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात सोसायटीतील अपूर्ण विकासकामांकडे लक्ष वेधण्यात आले असून, सांस्कृतिक सभागृहासमोरील गार्डन चे काम तसेच आवश्यक असलेली कामे पूर्ण करणे, तटरक्षक भिंतीला कंपाउंड वॉल प्लास्टर करणे, दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांचे काम पूर्ण करणे, दोन्ही गेट्स बसविणे आणि एसटीपी प्लांटची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच इमारतींमधील चेम्बर वारंवार तुटत असल्याने कायमस्वरूपी व दर्जेदार चेम्बर बसविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याचा दाब अपुरा असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, पाणीपुरवठा क्षमता वाढविणे अथवा अन्य पर्यायी व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
फाउंडेशनने लिफ्टच्या देखभाल-दुरुस्तीचा मुद्दाही उपस्थित केला असून, वारंवार बिघाड होणाऱ्या लिफ्टची योग्य देखभाल करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
सप्तगढ सोसायटीतील सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा रहिवाशांना होणाऱ्या त्रासाची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती महापालिके चे आयुक्त , महापौर, महापालिका विरोधी पक्षनेते, माजी महापौर आणि स्थानिक नगरसेवक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.


