शबनम न्यूज | प्रतिनिधी
ज्येष्ठ गायिका, लेखिका व अभिनेत्री सौ. माधवी प्रताप राजे लिखित ‘असे मला वाटते…!’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी ज्येष्ठ पत्रकार व संगीत समीक्षक मा. श्री. मुकुंद संगोराम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात आयोजिका माननीय संध्या साठे यांनी सादर केलेल्या ‘आजि सोनियाचा दिनु’ या गीताने झाली. प्रास्ताविकात मधुमती प्रकाशनच्या प्रमुख सौ. निवेदिता नचिकेत मेहेंदळे यांनी पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “रोजच्या जीवनात सकारात्मक राहून आनंदाने जगावे, म्हणजे आयुष्य आनंददायी आणि जगणे सोपे होते, हे माधवीताईंच्या स्फुट लेखनातून प्रकर्षाने जाणवते. साहित्य, नाट्य, संगीत यांसारखे कलाप्रकार माणसाला जगण्याची नवी ऊर्जा देतात आणि एकमेकांच्या जीवनात आनंदाची देवाणघेवाण घडवून आणतात.”
यानंतर सौ. वंदना पुरकर, सौ. अंजली पंचाक्षरी तसेच सौ. माधवी राजे यांच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींनी पुस्तकाविषयी आपली मनोगते व्यक्त केली.
आपल्या उत्तरपर भाषणात सौ. माधवी प्रताप राजे म्हणाल्या, “हे पुस्तक म्हणजे सरस्वतीने मला दिलेल्या लेखनप्रसादाचा सन्मान आहे. माझ्या कुटुंबीयांनी व मैत्रिणींनी अत्यंत प्रेमाने माझे लेखन प्रकाशित करून मला प्रोत्साहन दिले. मा. श्री. मुकुंद संगोराम यांनी माझ्या पुस्तकाचे प्रकाशन करून मला आनंद दिला आणि माझ्या लेखनाची शाबासकी दिली. त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे.”
शब्द लिखित स्वरूपात आले की ते टिकाऊ होतात. सुखी आणि समाधानी वक्तिबद्दल मुकुंद सांगोराम यांनी सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाशक निवेदिता मेहेंदळे यांनी केले.व सूत्रसंचालन ज्योती वाटवे यांनी केले. आप्तेष्ट, साहित्यप्रेमी व रसिक यांच्या उपस्थितीत हा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न झाला.


