spot_img
spot_img
spot_img

दळवीनगर-आनंदनगर रेल्वे हद्दीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाची भाऊसाहेब भोईर यांची मागणी

कारवाईपूर्वी पारदर्शक पडताळणीची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील दळवीनगर ते आनंदनगर परिसरातील रेल्वे लगतच्या झोपडपट्टीधारकांवर रेल्वे विभागाकडून ६ व ११ जून रोजी जागा खाली करण्याची कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी बाधित रहिवाशांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी योग्य पुनर्वसनाची मागणी केली आहे.

भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे हद्दीतील अनेक रहिवाशांना एसआरए (SRA) प्रकल्पांतर्गत पात्र ठरविण्यात आले असून संबंधित विकसक त्याचा लाभ घेत आहेत. त्यामुळे पात्र नागरिकांची सखोल शहानिशा करून त्यांना पुनर्वसन सदनिका उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच एसआरएच्या नियमांनुसार संबंधित रहिवाशांशी भाडेकरार करून त्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात यावे.

कारवाईपूर्वी रेल्वे हद्दीतील सर्व रहिवाशांची पारदर्शक पडताळणी करून पात्र व अपात्र लाभार्थ्यांची निश्चिती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कोणताही पात्र नागरिक पुनर्वसनाच्या लाभापासून वंचित राहू नये आणि अपात्र व्यक्तींना अनुचित लाभ मिळू नये, याची खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले आहे.

एसआरए प्रकल्पांतर्गत पुनर्वसित होणाऱ्या सर्व पात्र कुटुंबांना पुनर्वसन सदनिकेचा ताबा मिळेपर्यंत नियमानुसार मासिक भाडे अथवा भाडेभत्ता वेळेवर देण्यात यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, पावसाळा सुरू होत असल्याने कोणतीही कारवाई करताना मानवी दृष्टिकोन ठेवून निर्णय घ्यावा, असे भोईर यांनी म्हटले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही आणि त्यांचे शैक्षणिक हक्क अबाधित राहतील, याची संबंधित यंत्रणांनी खात्री करावी, असेही त्यांनी नमूद केले.

पात्र रहिवाशांच्या हिताचे संरक्षण करून त्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत एसआरए प्राधिकरण, रेल्वे प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी समन्वयाने काम करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!