spot_img
spot_img
spot_img

दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी-चिंचवड’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहराचे वैभव असलेल्या दुर्गादेवी टेकडी सारख्या विविध ठिकाणी पाच लाख झाडे लावून ती जगविण्याचा निर्धार आज महापालिकेने केला आहे, यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दुर्गाटेकडी येथे मान्यवरांच्या हस्ते १,००० रोपांची लागवड करून ‘हरित पिंपरी-चिंचवड शहर’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला,त्यावेळी महापौर रवि लांडगे बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी विजय जगताप लिखित ‘दुर्गा टेकडीचा ५० वर्षांचा इतिहास’ या माहितीपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे,आमदार अमित गोरखे, उमा खापरे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, क्रीडा,कला,साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे,नगरसदस्या शैलजा मोरे, अरूणा लंगोटे,नगरसदस्य कुशाग्र कदम, नीलेश नेवाळे, अमित गावडे, निलेश तरस,अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, मनोज सेठीया यांच्यासह भारतीय लष्कराचे ब्रिगेडीअर प्रकाश भारती, कर्नल अनिल फाटक, पोलीस उपआयुक्त विक्रम देशमुख, जुन्नर येथील वृक्षमित्र प्रकाश करमाळे,सामाजिक कार्यकर्ते अमोल भोंडवे, प्रा.नामदेव जाधव यांच्यासह नागरिक, पर्यावरण प्रेमी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निगडी प्राधिकरण येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृह ते दुर्गादेवी टेकडी दरम्यान १० किलोमीटर अशी सायकल फेरी आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांच्यासह शेकडो सायकलपटू सहभागी झाले होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, झाडांची केवळ लागवड करणे पुरेसे नाही, तर त्यांची योग्य निगा राखणे आणि त्यांना जगविणे हे प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सामाजिक बांधिलकीतून शहर स्वच्छ ठेवणे, कचरा न करणे आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी देखील आहे.

आमदार अमित गोरखे म्हणाले, वृक्ष लावणे हे आपले आद्य कर्तव्य आहेच, परंतु त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपण लावलेले किमान एक झाड पूर्णपणे जगविण्याचा संकल्प केला पाहिजे.

आमदार उमा खापरे म्हणाल्या, पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःहून झाडे लावून दुस-यांनाही झाडे लावण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगायचे आहे,जेणेकरून पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्यास मदत होईल.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, दुर्गा टेकडी हे केवळ एक उद्यान नसून पिंपरी चिंचवड शहराचे अमूल्य नैसर्गिक रत्न आहे. ‘दुर्गा’ या नावातच सामर्थ्य आणि ऊर्जा दडलेली असून ही टेकडी नागरिकांना सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा आणि निसर्गाशी जोडणारी महत्त्वाची जागा आहे. या टेकडीचे वैभव घडविण्यात अनेक घटकांचे योगदान आहे. तिचे पावित्र्य, स्वच्छता आणि नैसर्गिक संतुलन राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. दुर्गा टेकडीला देशपातळीवर एक प्रमुख प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. त्याचबरोबर यावर्षी शहरातील वृक्षाच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!