शबनम न्यूज | प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी (एडीटी) विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ३०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (मॅनेट) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यापीठाचे प्र-कुलपती व कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड यांच्या प्रेरणेने तसेच कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेत मॅनेटच्या ३०० कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कांचन, बहावा, गुलमोहर आणि पाम (ताड) यांसह विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड विद्यापीठ परिसरात करण्यात आली.
या प्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. नचिकेत ठाकूर, विद्यार्थी कल्याण संचालक प्रा. डॉ. सूराज भोयर, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण, एमआयटी स्कूल ऑफ ड्रामाचे प्राचार्य डॉ. अमोल देशमुख, सुरक्षा व दक्षता संचालक कर्नल प्रशांत वाघमारे, उपकुलसचिव डॉ. हनुमंत पवार, सहाय्यक संचालक डॉ. प्रतिभा जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विद्यापीठाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरण जनजागृतीलाही प्राधान्य देण्यात आले. यानिमित्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तीन पर्यावरणविषयक लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये ‘पृथ्वी आपली, जबाबदारीही आपली!’, ‘बिन इट राइट!’ आणि ‘गिरिमित्र’ या लघुपटांचा समावेश होता. निसर्ग संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत जीवनशैली यांविषयी प्रभावी संदेश या चित्रफितींमधून देण्यात आला.
‘पर्यावरण संवर्धन ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून ती जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे. हरित परिसर निर्मितीसाठी आणि भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे,’ असे मत डाॅ.नचिकेत ठाकूर यांनी व्यक्त केले. भविष्यातही पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


