spot_img
spot_img
spot_img

विद्युत तारा लोंबकळत असल्याने भीमशक्तीनगरमध्ये जीवितास धोका; तात्काळ दुरुस्तीची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील स्पाईन रोडलगत असलेल्या भीमशक्तीनगर परिसरात विद्युत तारा धोकादायकरीत्या खाली लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, भीमशक्तीनगर हा दाट लोकवस्तीचा परिसर असून येथे विद्युत तारा घरांच्या अगदी जवळ आणि रस्त्यालगत खाली आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात सुमारे दहा हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास असून दररोज मोठ्या प्रमाणात पादचारी आणि वाहनांची वर्दळ असते.

विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून ही समस्या कायम असून संबंधित विभागाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

दरम्यान, आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे विद्युत तारा तुटण्याची किंवा शॉर्टसर्किट होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मारुती जाधव यांनी महावितरण प्रशासनाने तात्काळ पाहणी करून लोंबकळणाऱ्या विद्युत तारा उंचावाव्यात, आवश्यक दुरुस्ती करावी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याने महावितरण प्रशासनाने त्वरित दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!