अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचा उपक्रम…
शबनम न्यूज | प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने सेक्टर २६, प्राधिकरण येथील मल्लिकार्जुन मंदिर उद्यानात तसेच संत तुकाराम उद्यान से 27 अ या ठिकाणी भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, हरित परिसर निर्मिती आणि निसर्गाशी नाते दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या विचाराला अनुसरून आयोजित कार्यक्रमात नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. “एक पेड माँ के नाम” या अभियानांतर्गत वृक्ष लागवड करून पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका सौ. शैलजा अविनाश मोरे आणि भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी उपस्थितांना अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेशही त्यांनी दिला.
या उपक्रमामुळे परिसर हरित होण्यास मदत होणार असून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीलाही चालना मिळणार आहे.


