शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी : मराठा सेवा संघ, पिंपरी-चिंचवडच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोरवाडी चौक, पिंपरी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष एस. इंजिनिअर शिवश्री आबासाहेब ढवळे, वधू-वर कक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री वसंतराव पाटील तसेच शिवश्री सखाराम एखे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्श विचारांचे स्मरण केले.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजकल्याण, न्यायव्यवस्था, धर्मसंरक्षण आणि लोकहितकारी प्रशासनाच्या माध्यमातून इतिहासात अजरामर कार्य केले आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना आदरांजली वाहिली.



