spot_img
spot_img
spot_img
spot_img

इंद्रधनू सप्तरंगी सेवा सोहळा उत्साहात संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २, झोन ७ आयोजित इंद्रधनू सप्तरंगी सेवा सोहळा रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी हाॅटेल ब्लू वाॅटर, पुनावळे येथे उत्साहात संपन्न झाला. लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ राजेश आगरवाल, लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रेयस दीक्षित, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी. एल. जोशी, एम. सी. सी. लायन विजय सारडा, झोन चेअरपर्सन हिरामण राठोड आणि समन्वयक राजेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीसह झोन ७ मधील अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सभासद यांची मोठ्या संख्येने सोहळ्यास उपस्थिती लाभली होती. आरोग्य, पर्यावरण, बालआरोग्य, दुर्धर व्याधी उपचार, शिक्षण, युवासक्षमीकरण आणि सामाजिक सेवाकार्य या सात आयामांसाठी २०२५ – २६ या कालावधीत झोन ७ मधील सात क्लबनी केलेल्या सेवाकार्याचा गौरव याप्रसंगी करण्यात आला.

दीपप्रज्वलन आणि माही बुटाला या युवतीने सादर केलेल्या गणेशवंदना नृत्याने सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. हिरामण राठोड यांनी प्रास्ताविकातून लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी, चिंचवड राॅयल, पुणे मेट्रोपोलीस, पुणे आकुर्डी, पुणे इनोव्हेशन, पिंपरी डिजिटल आणि व्हिजनरी या झोन ७ मधील सात क्लबने केलेल्या विविध सेवाकार्याची माहिती दिली. यावेळी राजेश आगरवाल यांनी, ‘झोन ७ मधील सेवाकार्य हे मानवंदना देण्याच्या योग्यतेचे आहे’ , असे गौरवोद्गार काढले. श्रेयस दीक्षित आणि विजय सारडा यांनी प्रशंसापर शुभेच्छा व्यक्त केल्यात. यानिमित्त संपन्न झालेल्या स्नेहमेळाव्यात श्रवणीय चित्रपटगीतांच्या तालावर आणि आकर्षक वेषभूषेत युगुलनृत्य, समूहनृत्य, संपूर्ण कुटुंबाचे नृत्य, महिला समूहनृत्य सादर करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आकाशवाणीवरील एकाच वेळी लागलेल्या चार रेडिओ स्टेशन्सच्या क्रास कनेक्शनमुळे उडालेल्या गोंधळाच्या विनोदी सादरीकरणाने सर्वांना मनसोक्त हसवले; तर स्वर्गीय आशा भोसले यांना श्रद्धांजलीनिमित्त सादर करण्यात आलेल्या दिलखेचक नृत्याविष्कारावर उपस्थितांनी ठेका धरला होता; तसेच एकल स्वरातील गीतगायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. या मनोरंजनात्मक सादरीकरणात राॅयल क्लब ऑफ चिंचवडने प्रथम क्रमांक पटकावला. सोफिया जैन यांनी परीक्षण केले. मान्यवरांच्या हस्ते सेवाक्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती आणि क्लब यांना सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले; तसेच सोहळ्यासाठी सहकार्य आणि योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. प्रा. शैलजा सांगळे आणि शामकुमार माने यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र काळे यांनी आभार मानले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!