शबनम न्यूज | प्रतिनिधी
अभिनेता रितेश देशमुख याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाने प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण होत असतानाही बॉक्स ऑफिसवर आपली घोडदौड कायम ठेवली आहे. 1 मे रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांना भुरळ घालत विक्रमी कमाईची नोंद केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरलेल्या ‘राजा शिवाजी’ने मराठी आवृत्तीत आतापर्यंत 82.66 कोटी रुपयांची एकूण (ग्रॉस) कमाई केली आहे. तर निव्वळ (नेट) कलेक्शन 70.02 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे चित्रपटाने हा टप्पा गाठला आहे.
चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीनेही उल्लेखनीय कामगिरी करत मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित केले. हिंदी व्हर्जनने 29.71 कोटी रुपयांची एकूण (ग्रॉस) कमाई आणि 25.15 कोटी रुपयांचे निव्वळ (नेट) कलेक्शन नोंदवले आहे. याचबरोबर हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनण्याचा मान ‘राजा शिवाजी’ने पटकावला आहे.
मराठी आणि हिंदी या दोन्ही आवृत्त्यांची कमाई मिळून चित्रपटाचे भारतातील एकूण निव्वळ कलेक्शन 95.17 कोटी रुपये, तर एकूण ग्रॉस कमाई 112.38 कोटी रुपये झाली आहे. याशिवाय परदेशी बाजारपेठेतून चित्रपटाने 4.27 कोटी रुपयांची कमाई केली असून, जगभरातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 116.65 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
ऐतिहासिक विषय, भव्य निर्मितीमूल्ये, दमदार अभिनय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रभावी मांडणी यामुळे ‘राजा शिवाजी’ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर महिनाभर उलटूनही चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी कायम असल्याने आगामी काळात हा चित्रपट आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



