चार्जिंग स्टेशन उभारणीला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘विकसित महाराष्ट्र 2047’ या राज्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाला अनुसरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व बसेस टप्प्याटप्प्याने ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्यभर चार्जिंग स्टेशनचे मजबूत जाळे उभारण्याच्या कामाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ‘वर्षा’ निवासस्थानी एसटी महामंडळाच्या ई-बसेस प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. बैठकीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत एसटीच्या ताफ्याचे टप्प्याटप्प्याने विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यानुसार 2029 पर्यंत एसटीचा 50 टक्के ताफा, 2035 पर्यंत 80 टक्के ताफा आणि 2047 पर्यंत संपूर्ण 100 टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध बसमार्गांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विश्लेषण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच पुरवठादारांकडून ई-बसेस प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत त्यांची तांत्रिक तपासणी पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी ई-बसेससाठी स्वतंत्र परिसंस्था (इकोसिस्टम) विकसित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. सध्या खासगी बससेवा सुरू असलेल्या मार्गांचा अभ्यास करून त्या ठिकाणी पर्यायी ई-बस सेवा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्याच्या विद्यमान ई-वाहन धोरणानुसार सार्वजनिक वाहतुकीत ई-बसेसचा वापर वाढविण्यासाठी 1,500 बसांना त्यांच्या किमतीच्या 10 टक्के किंवा कमाल 20 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, एसटी महामंडळ सध्या जीसीसी (Gross Cost Contract) मॉडेलवर 5,150 ई-बसेसचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील प्रवाशांना आधुनिक, आरामदायी, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
राज्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला हरित ऊर्जेकडे नेणारे हे पाऊल महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे ठरणार असल्याचे मानले जात आहे.


