spot_img
spot_img
spot_img

“पुण्यश्लोक” या महानाट्यातून उलगडला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विचार प्रबोधन पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी दुमदुमलेले नाट्यगृह…पारंपरिक पध्दतीने ढोल पथकाद्वारे मानवंदना….धनगरी नृत्यासह,पिंगळा,वासुदेव अशा कलाकारांनी विविध प्रसंगांतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सादर करताना रसिकांकडून मिळणारी टाळ्यांची दाद…अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त हजारो शहरवासियांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘पुण्यश्लोक’ या ७५ कलाकारांच्या भव्य महानाट्याने त्यांच्या कर्तृत्वाचा गौरवशाली वारसा रसिकांसमोर प्रभावीपणे उभा केला.

लोककल्याण, न्यायनिष्ठा, स्वाभिमान आणि आदर्श प्रशासनाचा अजरामर वारसा जपणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या महानाट्याची सुरुवात आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी नगरसदस्य माऊली जगताप, कार्यकारी अभियंता विजय भोजने, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह माजी नगरसदस्य राजू दुर्गे, पुण्यश्लोक फाउंडेशनचे धनंजय तानले, सामाजिक कार्यकर्ते अशोक खरात, सूर्यकांत गोफणे, नवनाथ बिडे, अभिमन्यू गाडेकर, विना सोनवलकर, अजय दुधभाते, बिरू व्हनमाने, सचिन सरक, दिपक भोजने, भरत महानवर,विजय महानवर ,सुनिल माने, विजय अर्जुन,सुमेध कावळे,देवराम बिरगड,विठ्ठल देवकाते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

पुण्यश्लोक या महानाट्याच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या सुवर्णपानांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. सुमारे ७५ कलाकारांच्या सहभागातून साकारलेल्या या महानाट्याने उपस्थित प्रेक्षकांना इतिहासाच्या वैभवशाली दालनात घेऊन जाण्याचा अविस्मरणीय अनुभव दिला.अहिल्यादेवींचे दूरदर्शी नेतृत्व, प्रजेप्रती असलेली अपार बांधिलकी,धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आणि समाजहितासाठी केलेले कार्य यांचे प्रभावी चित्रण रंगमंचावर उभे राहिले.

नेत्रदीपक अभिनय, भव्य नेपथ्य, सुरेख प्रकाशयोजना आणि भावस्पर्शी संगीत यांच्या संगमातून साकारलेल्या या महानाट्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. प्रत्येक प्रसंगातून अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्त्वातील धैर्य, करुणा, न्यायप्रियता आणि लोककल्याणकारी विचारांचा प्रत्यय उपस्थितांना आला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे आजच्या पिढीसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत असून त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने अंगीकारावा, असा संदेश या महानाट्याद्वारे देण्यात आला. उपस्थित नागरिकांनी महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले.

लोककला, शाहिरी आणि ढोलवादनातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘विचार प्रबोधन पर्व’ अंतर्गत मोरवाडी चौक, पिंपरी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात अंबादास पडळकर व त्यांच्या ३० सहकाऱ्यांनी सादर केलेल्या आकर्षक गजनृत्याने झाली. त्यानंतर सामना ढोलपथक, मुंबई यांच्या वतीने ढोलवादनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अनोखे अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच ‘सुवर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव’ या विशेष कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविण्यात आले. भूपाळी, वासुदेव, पिंगळा, वाघ्या-मुरळी, धनगरी नृत्य, शाहिरी पोवाडे, आदिवासी आणि डोंबारी अशा विविध लोककला व व्यक्तीछटांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.यानंतर शाहिरी कार्यक्रमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर घडवून आणण्यात आला. या सर्व कार्यक्रमांमधून लोककला, इतिहास आणि सांस्कृतिक वारसाचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळाली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!